बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील अडचणी दूर करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी, एन. एम. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मागील तीन वर्षांपासून रखडला आहे. या पुनर्विकासातील अडचणी दूर करून विकासाला सुरुवात करा. येथील भाडेकरूंनाही योग्य ठिकाणी स्थलांतरित करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

बीडीडी चाळींच्या पुनर्विवासासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची स्थिती जाणून घेतानाच प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. ना. म. जोशी मार्ग येथे 32 बीडीडी चाळी असून 2500 भाडेकरू आहेत तर नायगाव येथे 42 चाळी आणि 3300 भाडेकरू आहेत. वरळी येथे 9600 भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करा. याकामी महसूल विभागाकडून आवश्यक तेवढे उपजिल्हाधिकारी किंवा नायब तहसीलदार नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

या बैठकीला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , टाटा हाऊसिंग, एल एन्ड टी कंपनी यांचे अधिकारी देखील उपस्थित होते.

मर्यादित वेळेत पुनर्विकास पूर्ण करा

यासंदर्भात प्रधान सचिव गृहनिर्माण एसव्हीआर श्रीनिवास यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत वस्तुस्थिती सांगितली तसेच या प्रकल्पांची माहिती दिली. मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे हा पुनर्विकास रखडला असून त्याबाबतही येणाऱया अडचणींचा उहापोह त्यांनी केला. सर्वसामान्यांना घरे मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी या सर्क अडचणी दूर करून कालबद्ध रीतीने पुनर्विकास पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.