माहीमच्या सी फूड प्लाझावर कोळी संस्कृती, परंपरेची मेजवानी; पालिकेच्या उपक्रमाला मुंबईकर, पर्यटकांची पसंती

कोंबडी वडे, बांगडय़ाचं तिखलं, सुरमई मसाला, तळलेले पापलेट, लज्जतदार कोळंबी, गावरान तांदळाची भाकरी, सुकं-रस्सेदार चिकन आणि कोळी संस्कृती-परंपरेची रेलचेल माहीमच्या पहिल्या फूड प्लाझावर सुरू आहे. लज्जतदार पदार्थांवर ताव मागण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांची अक्षरशः झुंबड पडत आहे. पालिकेच्या सहकार्याने महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

महिला बचतगट आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील पहिला ‘सी फूड प्लाझा’ सुरू करण्यात आल्याचे पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पालिकेच्या जी/उत्तर विभागाकडून आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी या ठिकाणी भेट देऊन पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.

परिसराला नवी झळाळी

माहीम चौपाटी सी फूड प्लाझाच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच सी फूड प्लाझा परिसरातील घरांना विशिष्ट रंगसंगती करण्यात आली आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी देण्यात आलेल्या स्टॉल्सची डागडुजी, स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच आकर्षक अशा रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांना आणि पर्यटकांना सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी छायाचित्रं घेण्याचीही उत्तम व्यवस्था उपलब्ध असल्याचे जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.