
सामना प्रतिनिधी । जालना
शंभर ग्रॅम सोने, २ किलो चांदी असे एकूण साडेचार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याचा बनाव करणाऱ्या मुनीमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कौशल्याने तपास करत अटक केली. पुजाआप्पा भगवानअप्पा दुकानदार (रा.अंबरवाडी, जिंतूर जि.परभणी) असे अटक केलेल्या मुनीमाचे नाव आहे. जिंतूर (जि.परभणी) येथील सराफा व्यापारी शिवराजअप्पा बेंडके (रा. जिंतुर, जि.परभणी) यांनी गेल्या शनिवारी जालन्यातील मुनीमाला सोने-चांदी खरेदी करून आणण्यासाठी पाठविले होते.
जालना सराफा बाजारातील रिध्दी बुलीअन यांच्या सुराणा ज्वेलर्स येथून 100 ग्रॅम सोने व पावणेतीन किलो चांदी मुनीमाने खरेदी केली होती. त्यानंतर मुनीमाने रिक्षातून जात असताना चोरट्यांनी भरदिवसा मारहाण करून लुटल्याची तक्रार बाजार पोलीस ठाण्यात केली होती. भरदिवसा झालेल्या लुटमारीच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात लक्ष घालून 24 तासात गुन्ह्याचा बनाव उघडकीस आणत मुनीमाच्या मुसक्या आवळल्या. मुनीमाने स्वतः चोरीचा बनाव करून गुन्ह्याची कबुली ददिली असून त्याने लपवलेले दागिणे परत दिले. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सह पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे, संतोष सावंत, फुलसिंग गुसिंगे, सदाशिव राठोड, विष्णु कोरडे, किरण मोरे, महिला कर्मचारी शमशाद पठाण यांनी ही कारवाई केली आहे.



























































