दहिसरच्या मुरबाळी देवी जलतरण तलावाची दुरुस्ती झालीच पाहिजे, शिवसेनेने केली निदर्शने 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या दहिसर येथील श्री मुरबाळी देवी जलतरण तलावाच्या दुरवस्थेच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक 1 च्या वतीने शुक्रवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. जलतरण तलावाची दुरुस्ती तत्काळ केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी पालिका प्रशासनाला देण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये श्री मुरबाळीदेवी तलावाची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था निर्माण झाली आहे. जलतरण तलावातील टाइल्स तुटलेल्या असल्याने जलतरणपटूंच्या पायाला इजा होत आहे, शौचालय, शॉवर रूम आणि लॉकरची दुरवस्था झालेली आहे. रबरी मॅट नसल्याने अनेक लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला या घसरून पडत आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी येथील बांधकामाचा स्लॅब पडला. दरवर्षी पालिका सभासद फीची रक्कम वाढवत आहे. पालिकेने नियुक्त केलेला ठेकेदार मात्र कोणत्याही सोयी पुरवत नाही. अशा अनेक प्रकारच्या गैरसोयी असल्याने येथील सभासदांनी याबाबतच्या तक्रारी माजी नगरसेवक संजय घाडी यांच्याकडे केल्या होत्या.

…तर तीव्र आंदोलन करू

पालिका प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन जलतरण तलावाची दुरुस्ती केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा आमदार विलास पोतनीस यांनी प्रशासनाला दिला.

तक्रारीची दखल नाही

संजय घाडी यांनी लेखी पत्राद्वारे सहा महिन्यांपूर्वी उपायुक्त किशोर गांधी यांच्याकडे सदर जलतरण तलावाची दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली होती, परंतु प्रशासनाने अद्यापही याच्यावरती कोणताही मार्ग काढला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार विलास पोतनीस, शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी, विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली  माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, बाळकृष्ण ब्रीद, संध्या दोशी, योगेश भोईर, रिद्धी खुरसंगे, विधानसभा प्रमुख अशोक महामुणकर यांच्यासह शिवसैनिकांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आली.