
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चापोली ते अजनसोंडा रस्त्यावरील खदानीत सुमारे 35 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा मृतदेह खदानीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात चाकूर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक तुकाराम मधुकर फड यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, चापोली येथे अजनसोंडा रोडवरील चापोली शिवारात असलेल्या गट नंबर 211 मधील एका खदानीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 30 ते 35 वर्षे वय असणाऱ्या 5 फूट 6 इंच उंची असलेला अंगाने मजबूत असलेल्या या व्यक्तीला अज्ञातांनी धारदार हत्यारांनी डोक्यात, चेहऱ्यावर, गळ्यावर, पाठीवर वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह खदानीत फेकून दिला. मृताची ओळख पटली नाही त्यामुळे खून झालेला व्यक्ती कोण, कोणत्या कारणासाठी खून करण्यात आला ते अजून स्पष्ट झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

























































