कंत्राटदाराच्या हत्येचा उलगडा केल्याचा पोलिसांचा दावा; नातेवाईकांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशातील मुर्शदपूर गावात कंत्राटदार हेमचंद यांची हत्या करण्यात आली होती. दहावीतील दोन विद्यार्थ्यांनी मिळून त्यांची हत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. फॅक्टरीचे काम सुरू करण्यासाठी त्यांना कारची आवश्यकता होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी गाडी पळवण्याचे नियोजन केले. त्यांनंतर पळवण्याच्या हेतूने त्यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी या दोन विद्यार्थ्यांना अटक केली असून त्यांच्याकडील मोबाईल आणि चोरलेली कार या वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिसांनी त्यांना बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे, मात्र कंत्राटदाराच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दहावीतील या विद्यार्थ्यांना पैसे कमवण्यासाठी फॅक्टरी सुरू करायची होती. त्यासाठी त्यांना एका कारची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी कंत्राटदार हेमचंद यांची कार पळवून नेण्याचे प्लॅनिंग केले. यासाठी ते कंत्राटदारावर नजर ठेवून होते. ज्या दिवशी त्यांना ही कार पळवायची होती त्या दिवशी मुर्शदपूर गावातील सेक्टर-4 मध्ये हे दोघे फिरत होते. त्यावेळी त्यांना हेमचंद रस्त्यात गाडी उभी करून व्हिडियो कॉलद्वारे बोलत असल्याचे दिसले.

हेमचंद यांनी फोन बंद केल्यावर या दोघांनी हेमचंद यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. पत्ता सांगण्यासाठी हेमचंद यांनी गाडीची काच उघडली. त्या क्षणी या दोन विद्यार्थ्यांनी कंत्राटदार हेमचंद यांना गोळी घातली आणि त्यांचा मृतदेह मुर्शदपूर गावात फेकून दिला आणि कार घेऊन पळ काढला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त विशाल पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी कंत्राटदार हेमचंद यांना पैसे देण्यासाठी एका व्यक्तिने फोन करून बोलावले होते. त्यासाठी ते गेले होते, पण त्यानंतर ते परत आलेच नाहीत. सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृतदेह मुर्शदपूर गावात सापडला. अटाई मुरादपूर गावातील नागरिक महेश यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सर्विलांस कॅमेऱ्याच्या मदतीने या प्रकरणाचा शोध घेतला. तेव्हा एक-दोन फुटेजमध्ये कंत्राटदाराची कार पोलिसांच्या नजरेस पडली. त्याद्वारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यांच्याकडून  कंत्राटदाराचे मोबाईल, कार, बाईक या वस्तू जप्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या