वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या प्रेयसीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारनेर

वारंवार पैशांची मागणी करीत असल्यामुळे वैतागलेल्या गोविंद उर्फ पप्पू सुरेश ढवण याने प्रेयसी संध्या सुभाष गव्हाणे हिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची जीवनयात्रा संपविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी गोंविंद यास अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता संध्या गव्हाणे या विवाहितेवर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पारनेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या हत्येचा सुत्रधार गोविंद ढवण याचा बारा तासांच्या आत शोध घेत त्यास जेरबंद केले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता अविवाहीत असलेल्या गोविंद याचे विवाहित असलेल्या संध्या हिच्याशी सुमारे वर्षभरापासून अनैतिक सबंध होते. या सबंधादरम्यान संध्या हिने गोविंद याच्याकडून आतापर्यंत सुमारे दिड लाख रूपये घेतले होते. त्यानंतरही तिचा पैशांचा तगादा सुरूच होता. कमविलेला सर्व पैसा संध्या हिलाच दयावा लागत असल्याने आपल्या घरीही तो पैसे देत नव्हता. अशातच संध्या हिच्याकडून पैशांची मागणी होत राहिल्याने गोविंद वैतागलेला होता. त्यातूनच शुक्रवारी सायंकाळी संध्या पाणी घेउन येत असताना गोविंद याने धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. त्यात संध्या गंभीर जखमी होउन तेथेच कोसळली व तिचा मृत्यू झाला. त्यानंतर हत्येसाठी वापरलेला चाकू तेथेच टाकून गोविंद याने दुचाकीवरून पळ काढला. पारनेर येथे येउन पोलीस ठाण्यात हजर होण्याचा विचार त्याने केला होता. परंतु घाबरल्यामुळे त्याने आपला विचार बदलून पारनेरमधून भाडयाची गाडी करून आळेफाटा मार्गे त्याने मुंबई गाठली.

संध्या हिच्या मृतदेहाची शिरूर येथे उत्तरीय तपासणी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली होती. गोविंद याने संध्यावर वार केल्याचे त्या परिसरातील नागरीकांना पाहिले होते. त्यानुसार गोविंद याचा शोध सुरू झाला. त्याच्याच बहिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार तो मुंबई येथे असल्याची माहीती समजल्यानंतर पो. ना. विनोद बोरगे, पो. कॉ. महेश आव्हाड, पो. कॉ. शिवाजी कावडे या आरोपी शोध पथकातील कर्मचा-यांनी मुंबईकडे कुच करीत गोवंडी येथून त्याच्या नातेवाईकांच्या घरून शनिवारी पाहटे त्यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हयाची कबुली दिली असून पैशांचा जाचाला कंटाळून आपण हे कृत्य केल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.