मुर्शिदाबाद तिहेरी हत्या प्रकरण- पैशांमुळे झाली तिघांची हत्या

पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथे झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या एका शिक्षकाची, त्यांच्या गर्भवती पत्नी आणि मुलासह निर्घृण हत्या करण्यात आली होती. घरात घुसून धारदार शस्त्राने हे हत्याकांड करण्यात आल्याने मुर्शिदाबाद परिसरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील मुख्य आरोपीला पकडण्यात आलं असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

मुर्शिदाबादमधील जियागंड परिसरात बंधू प्रकाश पाल (35) हे त्यांची पत्नी ब्युटी पाल (30) आणि मुलगा अंगन बंधू पाल (5) यांच्यासह राहत होते.  11 ऑक्टोबर रोजी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात तिघेही निपचित पडल्याचं आढळून आलं होतं. बंधू प्रकाश पाल हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. बंधू प्रकाश पाल हे संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे यामागे राजकीय संबंध असावा असा संशय पोलिसांना होता. मात्र, ही हत्या राजकीय कारणाने नव्हे, तर आर्थिक कारणाने झाल्याचं निष्पन्न झालं आहे.  या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्पल बेहरा याला पोलिसांनी सागरदिघि इथून अटक केली आहे.

बंधु पाल हे विमा पॉलिसी एजंट म्हणूनही काम करत होते. उत्पल बेहरा याने त्यांच्याकडून दोन पॉलिसी विकत घेतल्या होत्या. पण, यातील दुसऱ्या पॉलिसीची पावती त्यांनी उत्पल याला दिली नव्हती. त्यामुळे या दोघांमध्ये वादही झाला होता. तसंच पाल यांनी बेहरा याचा अपमानही केला होता. त्यामुळे उत्पल संतापला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्याचा बेत त्याने आखला होता. मात्र, त्याने बंधु यांच्यासह संपूर्ण पाल कुटुंबाची हत्या केल्याची कबुली उत्पल याने दिली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या