सख्खा भाऊ पक्का वैरी, भाऊ हरवल्याची तक्रार देणारा भाऊच निघाला खुनी

‘‘सख्खा भाऊ पक्का वैरी’’ अशी एक म्हण प्रचिलीत आहे मात्र ती प्रत्यक्षात घडली. लातूरमधील तांदूळचा या गावात आपला भाऊ हरवल्याची फिर्याद देणारा भाऊच खुनी निघाला आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विपीन हरिभाऊ गायकवाड याने त्याचा भाऊ हरवल्याची पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, तांदुळजा येथील बिट अंमलदार विष्णू चौगुले यांनी तपास चालू केला परंतु तपास करत असताना कुठलाही सुगावा लागत नव्हता. परंतु तक्रारदार विपीन गायकवाड याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना होणारी चालढकल पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही व तपासाची दिशा फिरली ती तक्रारदार विपीन गायकवाड यांच्यावरच आणि दिनांक 11/10/20 रोजी दुपारी 2 वाजता संशयित म्हणून विपीन गायकवाड व त्याचा मित्र विकास व्यंकट ढाणे याला मुरुड पोलिसांनी ताब्यात घेतले.

सख्ख्या मोठ्या भावाने प्रॉपर्टीच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून छोट्या भावाला दारू पाजून त्याचा घात केला. डोक्यात घाव घालून बेशुद्ध करून गळा आवळून सख्या भावाची हत्या केली. आरोपीने स्वतःच्या मारुती अल्टो गाडीमध्ये मृतदेह टाकून तांदुळजा येथून देवळा गाठले. त्यानंतर तेथील मांजरा नदी मध्ये हे प्रेत टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेच्या सुमारास लोकांची रेलचेल सुरू झाल्याने तो कट फसला. त्यानंतर त्याने आंजनपूर, कोपरा, धानोरा मार्गे थेट तट बोरगाव ता.आंबेजोगाई गाठले आणि मांजरा नदीत प्रेत फेकुन राजणी मार्गे तांदुळजा पोहचले असा कबुली जबाब दिला.

त्या कबुली जबाबाप्रमाणे पोलीस निरीक्षक ढोणे यांनी प्रेत फेकून दिलेल्या ठिकाणी पाहणी केली पण प्रेत काठोकाठ भरून वाहणाऱ्या मांजरा नदीत फेकल्यामुळे प्रेत शोधने एक आव्हान ठरले. पण प्रेत शोधणे तितकेच महत्वाचे असल्या कारणाने लातूर येथून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या टीमला पाचारण केले. अथक प्रयत्नानंतर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता एका काटेरी झुडपात मृतदेह आढळुन आला. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी तांदुळजा येथील प्राथमिक केंद्रात उशिरा नेहण्यात आला. आज पोस्टमॉर्टम करून सार्वजनिक स्मशामभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या