मुरुडमध्ये ‘हिट अ‍ॅण्ड रन’; दोन तरुण ठार, चालक फरार

मुरुडमध्ये आज ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा प्रकार घडला. भरधाव कारची मोटारसायकलला धडक बसून दोन तरुण ठार झाल्याची घटना अलिबाग-मुरुड मार्गावर बारशीव परिसरात घडली. कारचालक अपघाताची कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, रेवदंडा पोलिसांनी या फरार चालकाला रोहा येथील तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे अक्षय जयस्वाल आणि लालचंद्र गौड अशी आहेत. हे दोघेही आज अलिबाग-मुरुड मार्गावरून मोटारसायकलने प्रवास करत होते. त्यांची मोटारसायकल बारशीव परिसरात आली असता अलिबागकडून येत असलेल्या कारची त्यांना जोरदार धडक बसली. कारचालक संदीप म्हात्रे हा सुसाट गाडी चालवत होता. त्यामुळे अपघाताचे स्वरूप हे भयानक होते. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. म्हात्रे याने या जखमींना मदत करण्याऐवजी तो घटनास्थळावरून पळून गेला. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोन्ही जखमींचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला तपासणी नाक्यावर पकडले
म्हात्रे याची कार सुसाट होती. त्यामुळे मोटारसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती स्थानिक रहिवाशांनी मुरुड पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेवदंडा पोलि सांची रोहा येथे वाहनांची तपासणी सुरू होती. तिथेच पोलिसांनी म्हात्रेवर झडप घातली. या मार्गावर ‘हिट अ‍ॅण्ड रन’चे प्रकार वाढल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुसाट वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.