
गेल्या सहा दशकांहून अधिककाळ रसिकांना आपल्या सुरेल व्हायोलिनवादनाने तृप्त करणारे ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि संगीतकार पं. प्रभाकर जोग यांचं रविवारी सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, नातवंडं असा परिवार आहे. मराठी भावगीत आणि हिंदी गीतांचे त्यांनी व्हायोलिनवर सादरीकरण करून व्हायोलिनला गाते केले. हे ‘गाणारं व्हायोलिन’ आता अबोल झाले आहे. जोग यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पं. प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रुपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिनवादनाच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहायक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर ‘गीतरामायणा’च्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली. ‘गाणारं व्हायोलिन’ या नावाने अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले. या ध्वनिफितींना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आजही अनेक कार्यक्रमांमध्ये तसेच मंगलप्रसंगी गाणाऱ्या व्हायोलिनचे स्वर रसिकांच्या कानी पडतात. महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (2015), कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ‘सूरसिंगार पुरस्कार’, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै 2017), गदिमा पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे वसुंधरा पंडित पुरस्कार (2013) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या 1951 च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. 1952 साली पं. प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले.
‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यांनी एकूण 22 चित्रपटांना संगीत दिले.
‘स्वर आले दुरुनी’, ‘तेच स्वप्न लोचनात’, ‘बाजार फुलांचा भरला’, ‘हे चांदणे फुलांनी’, ‘सोनियाचा पाळणा’, ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’, ‘आला वसंत ऋतू आला’, ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ. पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. व्हायोलिनवादन आणि संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता.
एक सच्चा साधक गमावला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली
व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलीकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे. प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या.































































