
सामना ऑनलाईन । अलिगढ
उत्तर प्रदेशमधल्या अलिगढ येथे भगवद्गीता वाचणाऱ्या एका 55 वर्षांच्या मुसलमान व्यक्तिला जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. दिलशेर असं या व्यक्तिचं नाव आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दिलशेर हे एका कंपनीत सुरक्षा रक्षकाचं काम करतात. गुरुवारी रात्रपाळी आटपून सकाळी नऊच्या सुमाराला दिलशेर त्यांच्या घरी परतले. घरी परतल्यानंतर त्यांनी रोजची आन्हिकं उरकून भगवद्गीता वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या घरात जबरदस्तीने घुसलेल्या समीर आणि जाकिर नावाच्या तरुणांसह त्यांच्यासोबत आलेल्या काही तरुणांनी मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करून झाल्यानंतर ते तरुण त्यांच्याकडून धार्मिक पुस्तकं, भगवद्गीता आणि रामायणाचे खंड उचलून पळून गेले. दिलशेरच्या म्हणण्यानुसार, मी मुस्लीम आहे. पण, माझा धर्म अन्य कोणत्याही धर्माच्या पवित्र ग्रंथांना वाचण्यापासून रोखत नाही. गेल्या 38 वर्षांपासून मी भगवद्गीता वाचतो आहे.
या प्रकरणी समीर, जाकीरसह अन्य आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर आणि जाकीर फरार असून पुढील तपास सुरू आहे.

























































