
प्रसिद्ध वादक-संगीतकार निर्मल मुखर्जी यांचे पवई येथील रुग्णालयात बुधवारी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. ‘अशी चिकमोत्याची माळ’ या लोकप्रिय गीताला त्यांनी संगीत दिले आहे. ‘इक रास्ता है जिंदगी..’, ‘दिल क्या करे जब किसी से..’, ‘छू कर मेरे मन को..’ अशा अनेक गीतांना वाद्याची साथ केली आहे.
वादनाचे विलक्षण वेड असलेल्या निर्मल मुखर्जी यांनी वयाच्या दहाव्या वर्षीच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या टीममध्ये स्थान मिळवले होते. पुढे वैशिष्टय़पूर्ण वादनामुळे आर. डी. बर्मन, राजेश रोशन, कल्याणजी-आनंदजी यांच्यासह अनू मलिक, जतीन-ललित ते थेट विशाल-शेखर या संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. बोंगो, कोंगो, तुंबा, दरबुका, डी-जेंबे अशा सर्वच पाश्चिमात्य वाद्यांवर त्यांची हुकमत होती. पंधरा हजारांहून जास्त गाण्यांसाठी त्यांनी साथसंगत केली आहे. ते अरविंद हळदीपूर यांच्यासह ‘अरविंद निर्मल’ या नावाने संगीत देत. या जोडीने संगीत दिलेले ‘अशी चिकमोत्याची माळ’ गीत खूपच गाजले.
























































