फी न भरल्याने परिक्षेला बसू दिले नाही, त्रस्त विद्यार्थ्याने महाविद्यालय परिसरातच स्वत:ला पेटवले

उत्तरप्रदेशच्या मुजफ्परनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सात हजार रुपये फी न भरल्याने विद्यार्थ्याला परिक्षेला बसण्यास मनाई केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्याने अखेर महाविद्यालयाच्या आवारात स्वत:ला पेटवून घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उज्वल राणा असे त्याचे नाव असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला हायर सेंटर रेफर केले आहे. त्याची अवस्था गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुढाना कस्बा येथील उज्वल राणा या विद्यार्थ्याने फी न भरल्याने त्याला परिक्षेला बसण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे त्रस्त राणाने कॉलेज परिसरातच स्वत:ला पेटवून घेतले. तो 70 टक्के होरपळला असून त्याची अवस्था गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राणा याने आत्मदहनापूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता आणि चिठ्ठीही सोडली होती. त्या चिठ्ठीत त्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहीली आहे. या तिघांमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने म्हटले आहे. विद्यार्थी आंदोलन चिघळल्यानंतर पोलिसांनी प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आता या प्रकरणातील पीडीत विद्यार्थ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे,. प्राध्यापकांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले आहे. माझा अपमान केला आहे, तर यावर कॉलेजच्या प्राध्यापकांनी त्याचे हे आरोप फेटाळले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे शोषण केलेले नाही. फी च्या नियमानुसार कारवाई केली आहे.