माझी पत्नी काही अंशी हिंदुस्थानी, मुलाचे नावही नोबेल विजेते चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवलं! – एलन मस्क

माझी पत्नी शिवोन जिलिस काही अंशी हिंदुस्थानी असून मुलाचे नावही नोबेल विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवल्याचे टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क म्हणाले. जिरोधाचे संस्थापक निखिल कामत यांच्या ‘पीपलबाय डब्ल्यूटीएफ’ या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.

एलन मस्क यांच्या पत्नी शिवोन जिलिस या टेक एक्सपर्ट आहेत. त्या न्यूरालिंक कंपनीमध्ये 2017 पासून डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स पदावर आहेत. कॅनडातील ओंटारियो येथे जन्मलेल्या शिवोन यांना लहानपणी दत्तक देण्यात आले होते.

शिवोन जिलिस यांनी हिंदुस्थानात काही काळ वास्तव्य केले आहे का? असे विचारले असते एलन मस्क म्हणाले की, लहान बाळ असतानाच तिला दत्तक देण्यात आले होते. त्यानंतर ती कॅनडामध्ये वाढली. त्यांचे जैविक वडील विद्यापीठात एक्सचेंज स्टुडंट होते, कदाचित हिंदुस्थानी वंशाचे. म्हणून त्यांचा अर्धा वारसा हिंदुस्थानी आहेत. तिच्यापासून झालेल्या मुलाचे नाव नोबेल विजेते खगोलभौतिकशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवले आहे, असे मस्क म्हणाले.

सुब्रह्मण्यन चंद्रशेखर (1910-1990) हे एक हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. 1983 मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.