
ओएनजीसीतून नाफ्ताच्या गळती होवून लागलेल्या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा ओएनजीसीतून नाफ्त्याची गळती झाल्याने नागरिकांची भितीने घाबरगुंडी उडाली. सुरक्षेसाठी ओएनजीसीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. संतप्त नागरीकांनी ओएनजीसीच्या या ढिसाळ कारभाराबद्दल गेटवर जमून निषेध केला.
रात्री जोरदार पडलेल्या पावसामुळे एपीयु प्लांटमधील चेंबरमधून हा नाफ्ता वाहत नाल्यामध्ये आला आणि नाल्यातून मोठ्या प्रमाणात तो पिरवाडीच्या समुद्रात मिसळला. प्रकल्पा शेजारी राहणाऱ्या नागरीकांना याची माहिती समजल्यानंतर नागरिकांची भितीने घाबरगुंडी उडाली आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. ओएनजीसी प्रशासनाला या बाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानाना पाचारण करून वाहत जाणाऱ्या नाफ्त्याच्या लिक्विड वायुवर फोमचा मारा करून आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
समुद्रातून काढलेला नाफ्ता पाईपलाईन मार्गे उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात आणला जातो. हा नाफ्ता टाकीमध्ये साठवला जातो. मात्र मागील वेळेस ज्या ठिकाणाहून नाफ्ता गळती झाली होती त्या चेंबरमधून ओव्हरफ्लो झाल्यामुळे हा नाफ्ता बाहेर आला आणि पावसाच्या पाण्याबरोबर तो नाल्यामधून समुद्रात पसरला. नागरीकांचे दैव बलवत्तर म्हणून या वाहत जाणाऱ्या आग लागली नाही. नाही तर पुन्हा एकदा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकली असती. काही वेळाने ही गळती बंद केली असली तरी या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ओएनजीसीतून नाफ्ता गळती होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. 3 सप्टेंबरला मोठी आग लागून यामध्ये चार कामगार ठार झाले होते. मात्र त्यामधुन ओएनजीसीने काहीही बोध घेतला नसल्याचे दिसून येते.
या नाफ्ता गळतीनंतर परिसरात राहणारे नागरीक भितीने बाहेर पडले. या नागरीकांनी ओएनजीसीच्या गटेसमोर ठिय्या देवून गेट बंद केले आणि जोपर्यंत आम्हाला सुरक्षेची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नसल्याचा इरादा केला. बऱ्याच वेळानंतर ओएनजीसी उरण प्रकल्पाचे मुख्य नरेंद्र असीजा यांनी बाहेर येवून लोकांची समजूत काढली आणि पुन्हा असा गळतीचा प्रकार होणार नाही याची ग्वाही दिल्यानंतर नागरीकांनी माघार घेतली.
या बाबत उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे विचारणा केली असता ओएनजीसीतून नाफ्त्याची गळती झाली असून पावसाच्या पाण्यामुळे तो नाफ्ता नाल्यातून वाहत समुद्रात मिसळला. ओएनजीसी आणि अग्निशमन दलाच्या जवानानी नंतर ही गॅस गळती बंद केली. आत्ता प्रकल्प सुरळीत सूरू असून नागरीकांना कोणताही धोका नाही असे सांगितले. तर उरणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदिश कुलकर्णी यांनी येत्या आठवडाभरात ओएनजीसी बरोबर बैठक घेवून सूरक्षेचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. गळतीचे कारण मात्र त्यांना माहित नसल्याचे सांगितले.





























































