
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव यंदा 25 ऑक्टोबर 2020 रोजी साजरा होणार असून यावर्षी कोणतेही शारीरिक प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम होणार नाहीत. या कार्यक्रमाला मोजक्याच संख्येत स्वयंसेवक उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांना मार्गदर्शन करतील. सरसंघचालकांचे भाषण फेसबुकच्या माध्यमातून देशभर दाखवले जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरातील विजयादशमी उत्सव हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक जे मार्गदर्शनपर भाषण करतात ते संघाची पुढील वर्षभरातील नेमकी वाटचाल कशी असेल याचे दिशादर्शन करणारे असते. त्यामुळे माध्यमांसह देशभरातील संघप्रेमी आणि इतरही राजकीय कार्यकर्ते तसेच अभ्यासक यांचे या भाषणाकडे लक्ष लागलेले असते. नागपुरातील या कार्यक्रमाला सुमारे 5000 गणवेशधारी स्वयंसेवक आणि 20 ते 25 हजार नागरिक उपस्थित असतात त्याशिवाय माध्यमांच्या द्वारे हा कार्यक्रम देशभर दाखवला जातो.
हा कार्यक्रम दरवर्षी रेशीमबाग मैदानावर होत असतो. यंदा कोविडच्या परिस्थितीमुळे मोजकेच स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित केला असल्याची माहिती नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे
करवीरनगरीत यंदा शाही दसरा सोहळा नाही
कोल्हापूर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक जत्रा-यात्रा, सण-उत्सव रद्द करण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही भाविकांविना साध्या पद्धतीने साजरा होत आहे. आता म्हैसूरपाठोपाठ प्रसिद्ध असलेला आणि करवीर संस्थानापासून सुरू झालेला दसऱयाचा शाही सीमोल्लंघनाचा सोहळाही यंदा प्रथमच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवरात्रोत्सवात विजयादशमीला संपूर्ण देशात म्हैसूरपाठोपाठ करवीर संस्थान राजघराण्यातर्फे शाही सीमोल्लंघन करण्याची परंपरा आजही कायम आहे. राजघराण्यातील शाही परंपरेनुसार विजयादशमीदिवशी सायंकाळी सूर्यास्तावेळी राजपरिवारातील सर्व सदस्य शाही गणवेशात पारंपरिक मेबॅक गाडीतून लवाजम्यासह ऐतिहासिक दसरा चौकात येतात. श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, तसेच गुरुमहाराज यांच्या पालख्याही लवाजम्यासह दाखल होतात. तोफेची सलामी, पोलीस व सैन्य दलाचे वाद्यवृंद, हलगी, पैचाळाच्या ठेक्यात तलवार, दांडपट्टय़ांच्या प्रात्यक्षिकांतून राजपरिवाराचे होणारे स्वागत, तसेच संस्थानकाळातील सरदार, मानकऱयांचे वारसदार, पोलीस, सनदी व सैन्य दलाचे अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शाही परिवाराकडून लकडबंदचे पूजन होताच सोने (प्रतीकात्मक आपटय़ाची पाने) लुटण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरकरांची झुंबड उडते.






























































