
हिमालयातील 20 हजार 100 फूट उंचीच्या युनाम शिखरावर तिरंगा फडकवत गिर्यारोहक अक्षय भापकर यांनी नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अक्षय आणि त्याच्या टीमने माऊंट युनाम गिर्यारोहण मोहिमेची सुरुवात 7 ऑगस्ट रोजी मनालीजवळील नग्गर येथून केली. जिस्पा, भरतपूरमार्गे 16 गिर्यारोहकांचा चमू भरतपूर बेस पॅम्पला पोहोचला. समिट बेस पॅम्प 17 हजार 400 फुटांवर आहे. तेथे अचानक हवामान खराब होऊन हिमवर्षाव सुरू झाला. बाजूच्या पर्वतावर रॉक फॉल होऊ लागले. अनेक गिर्यारोहकांना विरळ हवेमुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. कमी ऑक्सिजन आणि खराब हवामानामुळे अनेकांना माघारी परतावे लागले. बर्फवृष्टी थांबल्याने 13 ऑगस्ट रोजी रात्री 12.30 वाजता पुन्हा चढाईला सुरुवात केली आणि दुसऱया दिवशी सकाळी 7.45 वाजता अक्षयसह आठ गिर्यारोहकानी माऊंट युनाम शिखर सर करताच तिरंगा फडकावत भारतमातेला मानवंदना दिली.



























































