नगर आणि धुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाला सुरूवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या नगर आणि धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी जाहीर केला आहे. प्रारूप प्रभाग रचना ७ ऑगस्ट पर्यंत तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहे.

जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभागांसह) तयार करणे, १३ ऑगस्ट पर्यंत तो तपासून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे, त्यानंतर १८ ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावास मान्यता देईल. २१ ऑगस्ट रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला राखीव साठी सोडत काढण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली जाईल २४ ऑगस्ट रोजी त्याची जाहिर सोडत काढली जाईल. २७ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचनेची (सोडतीनंतरची) अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध होईल. २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या जातील. १५ सप्टेंबर पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. २८ सप्टेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकती व सूचनांचा काळजीपूर्वक विचार करून निर्णय देईल. १ ऑक्टोबर पर्यंत महापालिका आयुक्त सुनावणी नंतर झालेल्या निर्णयानुसार प्रभाग रचनेच्या अधिसूचना व नकाशामध्ये योग्य ते बदल करून प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील.

४ सदस्यीय प्रभाग रचना होणार

महापालिकेच्या अधिनियमाच्या कलम ५ मध्ये दुरुस्ती करण्यात आली असल्याने एक सदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन जास्तीत जास्त प्रभाग ४ सदस्यांचे असतील. सर्व प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास १ प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा होईल अथवा २ प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच आरक्षण निश्चिती चक्रानुक्रमानुसार करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.