Nagar crime news – लाच स्वीकारताना कनिष्ठ सहायकाला रंगेहाथ पकडले

सभा मंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देण्याकरिता 22 हजारांची लाच घेताना नगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायकास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष बाळासाहेब जाधव (वय 39, रा. विद्या कॉलनी, कल्याण रोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार या जांभळी गावच्या सरपंच आहेत. त्यांच्या गावासाठी आमदार फंडातून 15 लाखांचा निधी मंजूर झाला होता. या कामाची वर्क ऑर्डर नगर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करून घ्यायची होती. या कामाची फाइल कनिष्ठ सहायक संतोष जाधव याच्याकडे होती. याची मंजुरी देण्याकरिता एकूण कामाच्या दीड टक्के म्हणजे 23 हजारांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 22 हजार 500 रुपये देण्याचे तक्रारदार सरपंचांनी मान्य केले.

याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली असता जाधव याने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावला.

तक्रारदार यांचे पती जाधव याला पैसे देत असताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी संतोष जाधव यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे, संतोष शिंदे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रूक, हारुन शेख यांच्या पथकाने केली.