पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी केले उपोषण

पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये घडत आहे. पाण्याच्या टँकरच्या नियमीत फेऱ्या होत नसल्यामुळे नागरिकांसिहत जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण केले.

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या पागोरी पिंपळगावावर तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याच्या टँकरच्या नियमीत फेऱ्या होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयसमोर उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. पागोरी पिंपळगावाला 70 हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्यासाठी टँकरच्या चार फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. मंजूर करण्यात आलेल्या फेऱ्या 2011 च्या जनगणनेनुसार मंजूर झाल्या आहेत. मात्र सध्या गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत टँकरच्या नियमीत फेऱ्या होत नसून चार ते पाच दिवसांनी टँकर गावात येतो. त्यामुळे नागरिकांना तसेच जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पशुधन जगवण्याचा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालय घाटले.

टँकरच्या फेऱ्या नियमीत केल्या जाव्यात आणि जनावरांसाठी दोन टँकर अतिरिक्त देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी ग्रामस्थ बाळासाहेब ढाकणे, कल्पेश घनवट, राजेंद्र दराडे, मन्सूर पटेल, संभाजी पाचरणे, संपत दराडे, सुनील पाखरे, अंबादास जावळे, आजिनाथ दराडे, एकनाथ वाघमारे, प्रल्हाद दराडे, निवृत्ती नागरे, शहामीर शेख, शरद बडे, सुखदेव नवगिर यांनी आज (15 मे 2024) तहसील कार्यलयासमोर उपोषण सुरु केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. आंदोलनाची दखल घेत आंदोलनस्थळी बाजार समितीचे संचालक अजय रक्ताटे आले व त्यांनी आंदोलकांचा प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला. त्यानंतर मते यांनी दिलेल्या आदेशानंतर आंदोलनस्थळी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अण्णासाहेब गहिरे, दुष्काळ निवारण कक्षाचे संदिप कासार, महादेव धायतडक हे आले व त्यांनी तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील. तसेच वाढीव टॅंकरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल असे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.