उड्डाणपुलाचे काम, त्यातच मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असतानाच बंदी असतानाही अवजड वाहने थेट शहरातून येत असल्यामुळे या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. रविवारीही या अवजड वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते.

नगर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, आत्तापर्यंत 83हून अधिक पिलर उभारण्यात आले आहेत. यावर आता सेगमेंट बसविण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू करताना जिल्हा प्रशासनाने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने शहरातील अवजड वाहतूक बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आली होती. त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सक्कर चौक, कोठी परिसर आदी भागात मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. अवजड वाहनांमुळे शहरात आजवर अनेक अपघात झाले आहेत. त्यात तिघांचा बळीही गेला आहे. मात्र, बंदी असतानाही ही अवजड वाहने सर्रासपणे नगर शहरातून जात आहेत.

पुणे-संभाजीनगर हा महत्त्वाचा महामार्ग शहरातून जात असून, याच महामार्गावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे आधीच वाहतूककोंडी होत असून, अवजड ट्रक, कंटेनरमुळे या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करूनही त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.