बिबटय़ाच्या वावरामुळे शेतीच्या कामांना लागला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील गुंडेगाव शिवारात बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे परिसरातील शेतकऱयांसह ग्रामस्थांच्या मनात बिबटय़ाची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी शेतातील कामांना ब्रेक दिला आहे, शिवाय शेतमजुरांनीदेखील कामावर येण्यास नकार दिला आहे.

गुंडेगावपासून जवळच असणाऱया धावडेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी सहा वाजता बिबटय़ाचे दर्शन झाले. धावडेवाडी शिवारात रस्त्याच्या कडेला असलेला बिबटय़ा येथील तरुण सुहास धावडे यांनी मोबाईलच्या कॅमेरात टिपला आहे. सुहास हा सोमवारी सायंकाळी धावडेवाडी डोंगराजवळ व्यायामासाठी गेला होता. त्यावेळेस डोंगराच्या वस्तीजवळ बिबटय़ा दिसून आल्याने त्यांनी तत्काळ नातेवाईक व ग्रामस्थांना याची माहिती दिली. यावेळी बिबटय़ा जवळपास पाच मिनिटे नजरेस पडत होता. संबंधित बाब नागरिकांनी वनविभागास कळविली असून, यावर पुढील उपाययोजना वनविभाग काय करते, याकडेच सर्व ग्रामस्थांचे लक्ष आहे.

गुंडेगाव वनक्षेत्र 850 हेक्टर असून, शेजारी श्रीगोंदा वनक्षेत्रही मोठय़ा प्रमाणात पसरलेले आहे. शेतशिवार समृद्ध असल्याने लपण्यासाठी झाडेझुडपे, गवताळ भाग आहे; तसेच डोंगराच्या पायथ्याशी, माथ्यावर शेत जमीन असल्याने म्हशी, गाई, शेळ्या शेतातच असल्याने त्यांच्यावरही बिबटय़ा हल्ला करण्याची शक्यता आहे.

रात्रीच्या वेळी कुणीही शेतात पाणी देण्यासाठी जाऊ नये, दिवसा जास्त दाबाची लाईट सोडण्यात यावी. शेतीपंपाची लाईट रात्री न सोडता दिवसा करावी. यामुळे शेतकरी रात्री-अपरात्री बिबटय़ाच्या दहशतीखाली वावरणार नाही. – संतोष भापकर, उपसरपंच, गुंडेगाव.

गुंडेगाव शिवारात झालेल्या बिबटय़ाच्या दर्शनाने ग्रामस्थांच्या मनात दहशत असून, शेतकऱयांनी शेतीची कामे थांबवली आहेत. वन विभागाचा एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही. त्यांना काहीही घेणेदेणे नाही. त्यांनी येऊन याबाबत परिसरातील शेतकऱयांकडे साधी विचारपूसदेखील केली नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. – दादासाहेब आगळे, ग्रामस्थ, गुंडेगाव.