राष्ट्रवादी काँग्रेस नगरमधून नक्की कुणाला उमेदावारी देणार, सगळ्यांना उत्सुकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे राष्ट्रवादीने या जागेसाठी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉक्टर अशोक विखे पाटील यांना काल मुंबईत बोलवून उमेदवारीबाबत चर्चा केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर काँग्रेसने सुद्धा दावा सांगितला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आपण नगरमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले, तर कधी त्यांनी काँग्रेसला इशारा देत ही जागा आपण लढवणार, असा दावाही केला होता. जर पक्ष नसेल तर अपक्ष निवडणूक लढवू असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुजय विखे हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

गेल्या काही वर्षापासून विखे पाटील यांच्या कुटुंबांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध डॉक्टर अशोक विखे पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या जागेसाठी या अगोदर राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यापाठोपाठ आता त्यांनी डॉ. अशोक विखे पाटील यांना मुंबई येथे बोलवले होते. निवडणुकीच्या संदर्भांमध्ये त्यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चाही केली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी स्वीकारणार का अशी चर्चासुद्धा अशोक विखे पाटील यांच्याशी केली आहे.

पवारांनी डॉ. अशोक विखे पाटील यांना बोलवून चर्चा केली असली तरी देखील उमेदवारीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या जागेवर कोण लढणार अशी उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे.