
यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने करंजी घाटातील हिरव्यागार व मनमोहक परिसरात कॉसमॉस व टिथोनियाची फुलेही डोलू लागली आहेत. प्रवासी या घाटांजवळ थांबून या फुलांसोबत उत्साहाने छायाचित्रे घेत आहेत. परंतु, या वनस्पतींचे हे सौंदर्य जितके भुरळ घालत आहे त्यापेक्षाही त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे भविष्यात घातक ठरणारे असल्याने वेळीच यावर नियंत्रण मिळवणे अतिशय गरजेचे असल्याचे मत निसर्गअभ्यासक तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाचे जिल्हाध्यक्ष जयराम सातपुते यांनी व्यक्त केले.
नगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समूहाने केलेल्या सर्वेक्षणानुसार चार वर्षांपूर्वी नगर भुईकोट किल्ला परिसरातून टिथोनिया व कॉसमॉस या वनस्पतींचे तण झपाटय़ाने फोफावत असल्याचे वन विभागाच्याही निदर्शनास आणून दिले होते.
या संस्थेतर्फे दरवर्षी रानफुले व फुलपाखरांचे सर्वेक्षण गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून या तणसदृश विदेशी वनस्पती थेट गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी या टिथोनिया व कॉसमॉसचे रोपे गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये निदर्शनास आल्याबरोबरच संस्थेच्या सदस्यांनी यांचे तातडीने निर्मूलन करण्यास सुरुवात केली. तरीही या वनस्पतींची प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या वनस्पतींचे उगमस्थान विदेशात असून, ते शोभिवंत वनस्पती म्हणून हिंदुस्थानात आणल्या गेल्या. या वनस्पतींवर वाढणारी कीड आपल्याकडे नाही. तसेच या वनस्पती जनावरे अथवा इतर प्राणी खात नाहीत. एक वनस्पती हजारोंच्या संख्येत बिया तयार करते. या बिया जमिनीवर पडून वर्षभर सुस्थितीत राहतात आणि पुढील वर्षी पुन्हा झपाटय़ाने फोफावतात. या वनस्पतींची तग धरून ठेवण्याची क्षमता काँग्रेस गवतापेक्षाही कित्येक पटींने अधिक असते. त्यामुळे यांचा प्रसार खूप झपाटय़ाने होतो.
जैवविविधतेची हानी वणव्यापेक्षा ठरेल भयंकर
या तणसदृश वनस्पतींच्या निर्मूलनाची मोहीम व्यापक स्वरूपात लवकर हाती घेतली गेली नाही, तर गर्भगिरीच्या जैवविविधता संपन्न डोंगररांगा अल्पावधीतच या निरूपयोगी वनस्पतींनी व्यापल्या जातील. विविधोपयोगी औषधी व स्थानिक वनस्पतींची तसेच जनावरांच्या चाऱयाची जागा या वनस्पती अल्पावधीतच बळकावून घेतील. या तणसदृश वनस्पतींच्या बिया परिसरातील शेतांमध्ये रुजून शेतकऱयांपुढे यांचे निर्मूलन करण्याची मोठी समस्या भविष्यात उभी राहू शकते. या तणसदृश वनस्पतींमुळे जैवविविधतेची होणारी हानी एखाद्या वणव्यापेक्षाही भयंकर ठरू शकते, असेही सातपुते सांगतात.
दुर्मिळ औषधी वनस्पती संपुष्टात येण्याची शक्यता
करंजीघाटासह गर्भगिरीची ही डोंगररांग म्हणजे नगर व बीड जिह्याचे निसर्गवैभव आहे. या ठिकाणच्या जैवविविधतेमुळे जिह्याला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. या गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये संस्थेच्या सदस्यांनी गेल्या काही वर्षांपासून वनस्पती, रानफुले, फुलपाखरे व पक्ष्यांचे सर्वेक्षण सातत्याने केलेले आहे. या भागात दीडशेपेक्षा अधिक प्रजातींच्या दुर्मिळ रानफुलांची नोंद घेतली गेली आहे. अर्जुन, अश्वगंधा, वेखंड, ब्राह्मी, सफेद मुसळी, पुनर्नवा, अनंतमूळ, जेष्ठमध, मंजिष्ठा, सोनमुखी, टेटू, सर्पगंधा, रिंगणी अशा अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती या डोंगररांगांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतात. मात्र, या तणसदृश्य वनस्पतीमुळे लवकरच ही जैवविविधता संपुष्टात येऊ शकते.
दर हिवाळ्यात रानजाईच्या सुगंधाने दरवळून जाणाऱया या गर्भगिरीला जणू या भुरळ घालणाऱया तणाची नजरच लागली आहे. या वनस्पती फुलायला सुरुवात झाली की सहज सापडतात. त्यामुळे या बिया परिपक्व होण्यापूर्वी त्या उपटून जाळून नष्ट करणे एवढाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे लवकरच निसर्गप्रेमी समूहातर्फे ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. परंतु, यासाठी प्रशासन व स्थानिक मनुष्यबळाचीही गरज असणार आहे. – जयराम सातपुते, निसर्ग अभ्यासक


























































