नगर-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा; आठ दिवसांत सहाजणांचा मृत्यू; दहा वर्षांत 450 प्रवाशांनी गमावले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-पुणे महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, प्रवाशांचे बळी जाण्यास बेजबाबदार प्रशासन जबाबदार असल्याचे चित्र आहे. अपघात केव्हा थांबणार आणि आवश्यक उपाययोजनांसाठी आणखी किती बळी प्रशासनाला हवेत, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दहा वर्षांत 450, तर आठ दिवसांत सहाजणांचा मृत्यू झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे चित्र आहे. महामार्गावरून जाणारा व येणारा प्रवासी घरी सुरक्षित पोहोचेल का, याची निश्चित खात्री कोणीही देऊ शकत नाही.

नगर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांची संख्या कमी झाली नाही, तर त्यात वाढ झाली. पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण व नगर शहराचे उपनगर असलेल्या केडगाव येथे भूसंपादनाचे काम अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे नगरहून पुण्याकडे जाताना केडगाव वेशीजवळ, सुप्यात अपना बेकरीजवळ, नारायणगव्हाण गावाजवळ सकाळी व सायंकाळी वाहनांची कोंडी होते. या वाहनकोंडीचा प्रश्न पोलिसांना गेल्या 10 वर्षांत सुटलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. चौपदरीकरणानंतर रस्त्याच्या मधोमध शाळा, गाव व पेट्रोल पंप वगळता सर्वत्र दुभाजक टाकण्यात आले होते.

गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल्स, ढाबाचालकांनी व्यवसाय उत्तम चालावा, यासाठी हॉटेल्स आणि ढाब्यांसमोरील दुभाजक तोडले. अशा ढाबा आणि हॉटेल्स चालकांविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, हा विभाग कोणाच्या दबावाखाली आहे, याचे उत्तर जनतेला मिळाले नाही. महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचे जीव तर गेलेच, पण शेकडो लोकांना अपंगत्व आले. तरीही प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच होत आहे.

अधिकाऱयांच्या बदल्या झाल्यानंतर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

 नगर-पुणे महामार्गावर अपघात नेमके कोठे होतात? का होतात? यासंदर्भात सुप्यात प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांची दहा वर्षांपूर्वी बैठक झाली होती. अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ, महामार्ग पोलीस, सुपा व नगर तालुका पोलिसांचा समावेश होता. या समितीने काही उपाययोजना सुचविल्या व त्यांची काही काळ अंमलबजावणीही झाली. मात्र, अधिकाऱयांच्या बदल्या झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. पाच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुभाजक टाकण्यास सुरुवातही केली होती; परंतु राजकीय दबावतंत्रामुळे ते काम बंद पाडले.

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल्समधून खुलेआम मद्यविक्री

 पूर्वीसारखी वाहने अडवून तपासणी करण्याबाबत पोलिसांवर मर्यादा आल्या आहेत. पोलीस लांबूनच वाहनांची छायाचित्रे घेतात आणि ई-चलन फाडतात. त्यामुळे एखाद्या वाहनधारकाने मद्यपान केले आहे किंवा नाही, याची खातरजमा होत नाही. त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गालगत सर्वच ढाबे किंवा हॉटेल्सला उत्पादन शुल्क विभागाचा परवाना नाही. तरीही खुलेआम मद्यविक्री होते. जेवणापेक्षा मद्यपानासाठी येणाऱया ग्राहकांचीच संख्या या ढाबे आणि हॉटेल्सवर अधिक आहे.

सुपा चौक आणि सुपा-पारनेर रस्त्यावर सर्वाधिक अपघात

 नगर-पुणे रस्त्यावर वाघुंडे शिवारात टोलनाका असल्यामुळे जीप व कार वगळता, ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने सुपा चौकातून वडनेरमार्गे म्हसणे फाटय़ावरून पुणे रस्त्यावर जातात. पुण्याहून नगरकडे येताना याच मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे सुपा चौक आणि सुपा-पारनेर रस्त्यावर अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या वाहतुकीस तत्काळ आळा घालावा, अशी सुपा ग्रामस्थांची मागणी आहे.