नगर – एटीएम लुटण्यासाठी चोरट्यांकडून जिलेटीन कांड्यांचा स्फोट; खडखडाटामुळे चोर रिकाम्या हाती परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

चोरी करण्यासाठी चोरटे नवनव्या पद्धतीने युक्ती वापरतात, अशीच एक युक्ती नगर तालुक्यामध्ये चोरट्यांनी वापरली. एटीएम मशीन फोडण्यासाठी चक्क त्यांनी जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरट्यांनी रविवारी पहाटे जिलेटीन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून एटीएम मशीन फोडल्याची घटना जखणगाव (ता. नगर) शिवारातील कुंदन हॉटेलच्या शेजारी घडली. या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर तबाजी काळे (वय 31 रा. जखणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार चोरटे वाहनातून आले. त्यांनी कुंदन हॉटेलच्या शेजारी असलेले वक्रंगी कंपनीचे एटीएम मशीन बसवलेल्या गाळ्याचे कुलुप तोडून शटर उचकटून आत प्रवेश केला.

एटीएम मशीनच्या खाली जिलेटीन कांड्या लावल्या. स्फोट घडवून एटीएम मशीन फोडले. दरम्यान या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरटे रिकाम्या हाताने परत गेले. जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट केल्याने परिसरात आवाज झाला. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चार चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये स्फोट केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.