सरकारी कामात अडथळा आणला, दोघांना शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सरकारी कर्मचार्‍यास दमदाटी व दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन जणांना येथील जिल्हा न्यायाधिश आर.एम.कुलकर्णी यांनी तीन महिने साधी कैद व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हनुमंत करांडे आणि विजय खांदवे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही सांडवे तालुक्याचे रहीवासी आहेत.

फिर्यादी छबु निमसे हे 29 मे 2016 रोजी नगर सांडवा येथून एसटी बस घेऊन वाहक भास्कर साळवे यांच्या सोबत सांडवा येथे गेले होते. सायंकाळी राजु खांदवे यांच्या घरासमोर एसटी लावून ते बस जवळ थांबले. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपी हनुमंत करांडे व विजये खांदवे यांनी निमसे यांना एसटी रोडवरुन नीट चालवता येत नाही का ? अशी विचारणा करुन मारहाण केली. यावेळी साळवे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही लाथाबुक्याने मारहाण व शिवीगाळ केली. तसेच तुम्ही तक्रार केलीत तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असा दमही दिला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकार पक्षाच्या वतीने बसचा चालक वाहक तसेच प्रत्यक्षदर्शी साथीदार यांच्या साक्षी न्यायालयासमोर नोंदविण्यात आल्या. वरील दोघाही आरोपींना न्यायालयाने दोषी धरुन 3 महिन्याची साधी कैद व दंडाची शिक्षा ठोठवली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड.केदार केसकर यांनी काम पाहिले.