‘नगर अर्बन’च्या शेवगाव शाखेतील ‘ते’ दागिने बनावट, सोने तारण प्रकरणातील लिलावावेळी बाब उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण प्रकरणाचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. आज बँकेच्या आवारामध्ये या सोन्याचा लिलाव सुरू झाला असताना पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बनावट सोने आढळून येताच बँकेच्या अधिकाऱयांनी लिलाव प्रक्रिया थांबविली. दरम्यान, बनावट सोने आढळल्याने 3 ते 4 कोटी रुपयांचे कर्जप्रकरण आता वादाच्या भोवऱयात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून नगर अर्बन बँकेच्या कारभाराची एक ना अनेक प्रकरणे उघड होत आहेत. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली या बँकेचा कारभार केला जात होता. या बँकेबाबत राज्य व केंद्र स्तरावर अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. कोटय़वधी रुपयांचे बोगस कर्ज दिल्याप्रकरणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर आर्थिक घोटाळे केल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्हीचा तपास सध्या सुरू आहे.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये शाखा अधिकारी गोरक्ष शिंदे यांनी 2018 साली बँकेच्या प्रशासनाला शेवगाव शाखेमध्ये साधारणतः 2018 पासून एकाच व्यक्तीच्या नावावर या सोनेतारण पिशव्या असल्याची शंका उपस्थित करून बँकेच्या प्रशासनाला पत्र देऊन याकडे लक्ष वेधले होते. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत नव्हती. त्यामुळे नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांनी बँकेला पत्र लिहून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी 2019 साली केली होती.

समितीच्या वतीने या प्रकरणासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र, बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यामुळे या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्यास तयार नव्हते. मात्र, आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर बँकेच्या वतीने या तारण सोन्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जाहिरात देऊन आज लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज बँकेच्या आवारात त्या पिशव्या फोडण्यात येत असताना पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने असल्याचे दिसून आल्याने खळबळ माजली आहे.