जिल्हा परिषदेत कोरोना वारियर्सचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
संपूर्ण जगासमोर आव्हान ठरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अविरत काम करीत आहे. एकीकडे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोना संशयित व कोरोनाबाधितांवर उपचार करीत असताना ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव करण्यासाठी नगर जिल्हा परिषदेचे जवळपास 45 ते 50 हजार अधिकारी योध्याप्रमाणे रणभूूमीत झुंज देत आहेत. कर्तव्य श्रेष्ठ मानून स्वत:च्या कुटुंबियांची पर्वा न करता जिल्हा परिषदेची यंत्रणा ग्रामीण भागात काम करीत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांपासून ते जिल्हा परिषदेतील सर्वच वरिष्ठ अधिकारी पूर्ण झोकून देवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीवेळी पदाधिकारी, अधिकार्‍यांनी टाळ्यांंच्या कडकडाटात जिल्हा परिषदेच्या कोरोना वारियर्सचे कौतुक केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कोरोनाला कायमचा हद्दपार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषदेत मंगळवारी बर्‍याच कालावधीनंतर पदाधिकारी, अधिकार्‍यांनी सोशल डिस्न्टन्सिंग राखत आढावा बैठक घेतली. यावेळी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेेळके, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती सुनिल गडाख, उमेश परहर, काशिनाथ दाते, मिराताई शेटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, डॉ.सुनिल तुुंबारे,  संजय कदम, श्रीकांत अनारसे, नितीन उबाळे, रमाकांत काटमोरे, डॉॅ.संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षा राजश्री घुले म्हणाल्या  की, कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन करून काळजी घेतली आहे. आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची साथ आटोक्यात आहे. यात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेचे मोलाचे योगदान आहे. या सर्व कोरोना वारियर्सचा अभिमान वाटतो.
सभापती सुनिल गडाख म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी,कर्मचार्‍यांची मोठी यंत्रणा राबत आहे. 14 गटविकास अधिकारी, 37 विस्तार अधिकारी, 829 ग्रामसेवक, 160 पशुसंवर्धन विभागातील अधिकारी,कर्मचारी, 217 ग्रामविकास अधिकारी, 4831 ग्रामविकास सहाय्यक, 3933 ग्रामपंचायत कर्मचारी, 898 आपले सरकार कर्मचारी, 5291 अंगणवाडी सेविका, 4397 अंगणवाडी मदतनीस, 14 तालुका  आरोग्य अधिकारी, 500 आरोग्य सेविका,  250 आरोग्य सेेवक,  84 औषध निर्माता, 122 पुरुष आरोग्यसेवक, 90 महिला आरोग्य सेविका, 12 आरोग्य पर्यवेक्षक, 11 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 206 कुष्ठरोग तंत्रज्ञ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, सहायक  संचालक कुष्ठरोग,  जिल्हा क्षयरोग अधिकारी, क्षयरोग अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 192 वैद्यकीय अधिकारी, 197 समुदाय आरोग्य अधिकारी असे 22 हजार 151 अधिकारी,कर्मचारी प्रत्येक गाव आरोग्य संपन्न ठेेवण्यासाठी झटत आहे. याशिवाय जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समितीतील कार्यालयीन कर्मचारी मिळून जवळपास अर्धा लाख कर्मचारी या साथीचा धाडसाने मुकाबला करीत जनतेला दिलासा देत आहेत.
जगन्नाथ भोर म्हणाले की, नगर जिल्हा परिषदेेला शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची मोेठी परंपरा आहे. दुष्काळ, अतिवृष्टी अशा आपत्तीच्या काळात ग्रामीण भागाला दिलासा देण्यात प्रशासकीय यंत्रणेला नेहमीच यश आले आहे. आताची कोरोना विषाणमुळे उद्भवलेली परिस्थिती खूपच कसोटी पाहणारी आहे. परंतु, पहिल्या दिवसापासून सर्व अधिकारी,कर्मचारी आपले विहित कर्तव्य अतिशय प्रामाणिकपणे बजावत आहेत. पदाधिकारी,  लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून गाव पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच गरजूंना आवश्यक ती मदत पोहचवून माणुुसकीचे कर्तव्यही सर्वजण बजावत आहेत.सांघिक  प्रयत्नातून कोरोनाला हद्दपार करण्यात नक्की यशस्वी होवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.