
नगर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर मंगळवारी झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीमध्ये विषय समितीच्या समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे विद्यमान सभापती उमेश परहर यांची व महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या मीरा शेटे यांची तर इतर दोन समित्यासाठी क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीप्रमाणेच विषय समिती सभापतींच्या निवडीही काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी कायम ठेवत बिनविरोध झाल्या आहेत. सभापतीपदाच्या निवडीतही संख्या बसणार नाही, हे लक्षात आल्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली.
जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मंगळवारी विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन होते. समाजकल्याण समितीसाठी राष्ट्रवादीचे उमेश परहर व भाजपचे सोमनाथ पाचारणे यांनी तर महिला व बालकल्याण समितीसाठी काँग्रेसच्या मीरा शेटे, भाजपच्या दिपाली गिरमकर व शिवसेनेच्या राणी लंके, सुषमा दराडे यानी अर्ज भरले. इतर दोन समित्यांसाठी क्रातीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते, भाजपचे जालिंदर वाकचौरे, कांतीलाल घोडके, रामहरी कातोरे, शरद झोगडे, अनिल कराळे, शरद नवले यांनी अर्ज भरले होते. गिरमकर, दराडे, लंके, पाचारणे यांनी माघार घेतली तर इतर समित्यासाठी वाकचौरे, घोडके, कातोरे , झोडगे, कराळे, नवले यांनी माघार घेतली. त्यामुळे समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे उमेश परहर यांची तर महिला व बाल कल्याण समितीसाठी काँग्रेसच्या मीरा शेटे यांची आणि विषय समितीच्या अन्य दोन समिती सभापतीपदी क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे सुनील गडाख, शिवसेनेचे काशीनाथ दाते यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते अंकुशराव काकडे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी नुतन समिती सभापतीचा सत्कार केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व कायम ठेवले आहे. मागील अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आल्यामुळे भाजपाने त्यावेळीही निवडणुकीतून माघार घेतली होती. यावेळीही महाविकास आघाडी कायम राहिल्यामुळे भाजपचे संख्याबळ असल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. महाविकास आघाडीतील सहभागी पक्षांच्या गटनेत्यांनी आपल्या सर्व सदस्यांना विप बजावला होता.

























































