
सामना ऑनलाईन, नागपूर
देशाच्या अनेक भागांना तापमान तडाखा बसायला लागला असून महाराष्ट्रातील नागपूरला याची जास्त झळ सोसावी लागत आहे. मंगळवारी देशातील सर्वाधिक तापमान नागपुरात नोंदवण्यात आलं असून इथे 44 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील वर्धा, अकोला आणि ब्रम्हपुरी ही शहरे देशातील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत असून इथे 43 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
#Nagpur in #Maharashtra is the #hottest city in #India with a maximum temperature of 44.1°C. https://t.co/Q1HRJLyY7I
— SkymetWeather (@SkymetWeather) April 10, 2019
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला विदर्भातील सात मतदारसंघांत मतदान होणार आहे. उष्णतेच्या तडाख्यामुळे आधीच प्रचारावर परिणाम झाला आहे. विदर्भातील बहुतांश भागांत सरासरी कमाल तापमानाने 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली आहे. मतदानाच्या दिवशीही पारा चढलेलाच राहणार आहे. त्यात काही मतदारसंघांत गडगडाटासह पावसाच्या एक-दोन सरींची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे वातावरणातील या बदलाचा मतदानावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
https://www.saamana.com/heat-wave-mahanad-sale-more-than-three-crore-per-month/
मतदानाच्या काळात निवडणूक आयोगाकडून हवामान खात्याकडून हवामानविषयक माहितीही जाणून घेतली जाते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार विदर्भात उष्णतेची लाट नसली तर सरासरी कमाल तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले आहे. हवेतील आर्द्रताही काही भागांत 56 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. त्याचा परिणाम मतदानवार होईल किंवा दुपारच्या वेळेत मतदानाची टक्केवारी कमी होण्याची चिन्हे आहेत. उन्हाचा तडाखा कमी झाल्यावर पुन्हा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात सोमवारपासून तापमान 42 अंश सेल्सिअस आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 11 एप्रिलला मतदानाच्या दिवशी या मतदारसंघात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. मतदानाच्या दिवशीच आकाश काही अंशी ढगाळलेले राहील. गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यताही वर्तवली आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस आहे. मतदानाच्या दिवशी 43 अंश सेल्सिअवर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांत आकाश ढगाळलेले राहील. गडगडाटासह पावसाच्या एक-दोन सरींची शक्यता आहे. नागपूरमध्ये आर्द्रता तर 56 टक्के नोंदवण्यात आली. गोंदियामध्ये सध्या 41 अंश सेल्सिअस असलेले कमाल तापमान मतदानाच्या दिवशी 42 अंश सेल्सिअवर जाईल. या भागात मतदानाच्या दिवशी आकाश ढगाळलेले राहील. यवतमाळमध्ये 10 एप्रिलपासून तापमान वाढणार असून 11 एप्रिलला कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवला आहे.


























































