नायब तहसिलदारला लाच घेताना रंगेहात पकडले

600

सामना प्रतिनिधी। अमरावती

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना नायब तहसिलदार किसन गणपत सूर्यवंशी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. 22 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

काही दिवसांपूर्वी नायब तहसिलदार सुर्यवंशी यांनी तक्रारदाराचा ट्रॅक्टर गौणखनिज मुरूम इत्यादींसह पकडला होता. तसेच कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर लाचलुचपत विभागाकडे ट्रॅक्टर मालकाने तहसिलदार यांच्या विरोधात तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून धामणगाव येथील राठी नगर येथे सूर्यवंशी यांना राहत्या घरी पकडले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

जमादाराला पकडले
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात वडेगाव येथे पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजुरा बाजारचे बीट जमादार अशोक पळसपगार यांच्यावर कारवाई करण्यात आली. शेजारच्या शेतातून बैलजोडी घेऊन जाण्याच्या कारणातून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावादातून शेतकऱ्याला कारवाई करण्याची धमकी देऊन लाच मागितली. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे, उपअधिक्षक गजानन पडघम, पीआय रविंद्र जेधे, शैलेश कडू, पंकज गोरसे, राजेश कोचे, सतीश किटुकले आदींन ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या