Nagpur news – सोलार कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; 10 कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजारगाव येथील सोलार कंपनीमध्ये बुधवारी रात्री भीषण स्फोट झाला. मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास झालेल्या या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ‘फ्री प्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बुधवारी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या सुरक्षा आमि व्यावसायिक स्फोटक युनिटमध्ये स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वी सीबी-1 या अणुभट्टीतून धूर येऊ लागला होता. काहीतरी गडबड असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र एक कर्मचारी वेळेत बाहेर पडू शकला नाही आणि स्फोटात त्याचा मृत्यू झाला.

स्फोटानंतर प्लांटच्या इमारतीचा काही भाग ढासळला. हा स्फोट एवढा भीषण होता की अनेक कामगार बाहेर फेकले गेले. तर काही दगड, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. स्फोटानंतर इमारतीचा भाग अनेक मीटरपर्यंत उडाले आणि त्यामुळे कामगार जखमी झाले, असे एका प्रत्यक्षदर्शी कामगाराने माध्यमांशी बोलताना सांगितले.

जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही कामगारांना नागपुरातील धांडे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 22-23 जणांना उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. बहुतांश कामगारांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून 2 महिलांसह 9 रुग्ण डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती या रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. नृपाल पांडे यांनी दिली.

दरम्यान, पोलीस पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून स्फोटांच्या कारणांचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे बाजारगाव येथील युनिटमध्ये स्फोट होण्याची दोन वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.