
राज्यातील तापमानात सध्या बदल होत आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात पावसाळी वातावरण होते. तसेच राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे. या पावसाळी वातावरणाने तापमान काही अंशांनी घसरले होते. मात्र, या आठवड्यात पुन्हा तापमान वाढणार असून राज्यात उन्हाचे चटके जाणवण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, बदललेल्या वातावरणामुळे विदर्भात पावसाळी वातावरण कायम राहणार असून काही ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
विदर्भात पावसाळी वातावरण पुन्हा अनुभवायला येणार आहे. पश्चिमेकडे बदललेल्या वातावरणाच्या परिस्थितीमुळे सोमवार ते बुधवार (13 ते 15 मार्चदरम्यान) विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाट आणि विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांना पुन्हा उन्हापासून दिलासा मिळणार आहे.
नव्याने सक्रिय झालेल्या पश्चिमेकडील वाऱ्यांच्या झंझावातामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर बिहारकडून छत्तीसगड, विदर्भ व तेलंगण आणि कर्नाटकाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य प्रदेशातून जाणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेच्या संयोगामुळे पुढचे काही दिवस वातावरण बदल दिसणार आहे. तसेच 13 ते 15 मार्च या तीन दिवसात विदर्भात ढगांची गर्दी राहणार असून तुरळक ठिकाणी विजा व ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच 14 व 15 मार्चलाही पावसाळी परिस्थिती राहणार आहे.
बदलत्या वातवारणामुळे दिवस आणि रात्रीचा पारा 2 अंशाने किंवा त्याखाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा व रात्रीच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान 24 तासांपूर्वी घसरलेल्या तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची व्यवस्था करावी,असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.


























































