
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली 20-25 वर्षे रस्त्यावर उतरत आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं वचन आम्ही दिलेलं आहे. वचन दिल्यानंतर आम्ही कसे वागतो आणि ते मोडल्यानंतर कसे वागतो हे जनतेला कळलेलं आहे. शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण तुम्ही आम्हाला करायला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षांनी आणण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मागीतलेल्या सुमारे 15 हजार कोटींच्या मदतीपैकी एक पैसाही अजून आलेला नाही. तेव्हा गोंधळ घालायचा असेल, शिमगा करायचा असेल तो केंद्र सरकारच्या नावाने करा, अशी समज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षाला दिली.
विरोधी पक्षाकडून आज दोन्ही सभागृहांत अवकाळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून गोंधळ घालण्यात आला. सभागृहात झालेल्या या प्रकाराबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विधिमंडळाची एक परंपरा आहे. अनेक दिग्गजांनी यामध्ये विविध पदे भूषविलेली आहेत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी इथे आल्यानंतर आपल्या व्यथांना आवाज फोडतील, समस्या मांडून सरकारकडून त्यावर न्याय मिळवून देतील अशी जनतेची अपेक्षा असते. या सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मागील दोन अधिवेशनांत जे काही झालं त्याचा घटनाक्रम जगासमोर गेला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांना आवाहन करतो की, एका परंपरेचा वारसा लाभलेलं हे सभागृह आहे. त्याला काळिमा लागेल असे वर्तन लोकप्रतिनिधींकडून होता कामा नये, असे सांगतानाच विरोधी पक्ष जसे आपण लोकप्रतिनिधी आहात तसेच आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. व्यथा-वेदना मांडा. त्यावर आमच्याकडून उत्तरं घ्या, पण जणू काही आपण एकमेव काहीतरी आहोत आणि सत्ताधारी पक्षाला काही पडलेलीच नाही अशा पद्धतीने वर्तन चालू आहे. हे वर्तन निंदनीय आहे, अशी समज उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना दिली.
साडेतीन हजार कोटींची मदत सरकारने वितरित केली
हे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कामाला लागलेलं आहे. लागल्यानंतर अवकाळी पाऊस असेल, धानाचा विषय असेल, या विषयावर सरकारने जी मदत दिली आहे त्याची आकडेवारी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलेली आहे. केंद्राकडून मदत आली नसली तरीसुद्धा महाराष्ट्राचं हे सर्वसामान्यांचं सरकार हाताची घडी घालून बसलेलं नाही. जवळपास साडेसहा हजार कोटींची मदत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यापैकी साडेतीन हजार कोटींची मदत वितरितही झाली आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्य सरकारकडे ठणाणा करून काही होणार नाही
केंद्राकडून राज्याकडे येणाऱ्या जीएसटीच्या परताव्याची 15 हजार कोटींची मदत बाकी होती. दोन-चार राज्यांसह महाराष्ट्राने मागणी केल्यानंतर केंद्र सरकार हलायला लागला. हे झाल्यानंतर आता साडेचार हजार कोटींचा पहिला हप्ता आलेला आहे. म्हणजे केंद्राने मान्य केलेलं आहे की आम्ही तुम्हाला द्यायला दिरंगाई केलेली आहे. असं जर का हे सरकार चालायला लागलं तर इकडे ठणाठणा करून काही होणार नाही. शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने त्यांनी करावा, राज्य सरकारच्या नावाने करू नये.
केंद्राकडे जाऊन गळा मोकळा करा, गळा मोकळा करण्याच्या गोळ्या मी देतो
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे सात हजार मागितले आहेत. त्याचप्रमाणे अवकाळी पावसासाठीही केंद्राकडे मागणी केलेली आहे. अशी सुमारे 15 हजार कोटींची मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. केंद्राकडून राज्याला जी मदत येणे आवश्यक होतं ती एक पैशाची मदतही आलेली नाही. इथे जे आदळआपट करीत आहेत त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रात आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. शेतकऱ्यांबद्दल इथे जे गळा काढताहेत त्यांनी तिकडे जाऊन गळा मोकळा करावा. हवं तर गळा मोकळा करणाऱ्या गोळ्या मी देतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सभागृहात जो शेतकऱ्यांबद्दल प्रश्न उचलला गेला आहे तो घेऊन गेली 20-25 वर्षे शिवसेना पक्ष म्हणून आणि या पक्षाचा प्रमुख म्हणून मी स्वतः रस्त्यावर उतरलेले आहे. मग तो पंतप्रधान पीक योजनेतला घोटाळा असेल, शेतकरी सन्मान योजनेतील अपुरी आलेली मदत असेल, कर्जमुक्ती असेल, प्रत्येक वेळी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. हे वचन देऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. लोकांना कळलेलं आहे की वचन मोडल्यानंतर आम्ही कसे वागतो आणि वचन दिल्यानंतर आम्ही कसे वागतो. दिलेले वचन आणि दिलेला शब्द पाळणारे आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गोरगरीब जनतेच्या अपेक्षा चिरडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही
राज्यामध्ये शांतता आहे, व्यवस्थित सर्व चालू आहे. शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे तो शब्द माझ्या आणि शेतकऱ्यांमधला आहे. तो मी पाळणार आहे. पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा आव आमच्या विरोधी पक्षांनी आणण्याचा प्रयत्न करू नये. मला असं वाटतं, तुम्हाला प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे. बोंबलून प्रश्न मांडता येत नाहीत. आमचं उत्तर न ऐकता जर बोंबलत बसलात तर तुमचा कांगावा जनतेसमोर उघडा होत आहे. लोकांसमोर तुमचंच बिंग फुटत आहे. हे मी विरोधी पक्षाला एकेकाळचे माझे मित्र म्हणून सांगतोय. सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनामध्ये जो आनंद, अपेक्षा, आशा पल्लवित झाल्या आहेत. त्या अपेक्षा चिरडण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. आम्ही जनतेला आणि गोरगरीबांना बांधील आहोत. हा शिवरायांच्या महाराष्ट्राला शिवरायांनी जो आदर्श घालून दिला आहे की गोरगरीब जनतेच्या हक्काचे रक्षण करणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘सामना’ वाचला असतात, तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती
आज एक आणखी आश्चर्य पाहायला मिळालं ते म्हणजे आम्ही ‘सामना’ वाचत नाही, आम्ही ‘सामना’ बघत नाही असे म्हणणाऱ्यांनाच ‘सामना’ हातात घेऊन दाखवावा लागला. यालाच नियतीचा खेळ म्हणतात. कालाय तस्मै नमः. ‘सामना’ आधी वाचला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. तेव्हा ‘सामना’ आणि शिवसेनेला विरोधक म्हणून समजत होते. आज आमच्या विरोधकांच्या हातात ‘सामना’ आलेला आहे. ‘सामना’ हे सर्वसामान्यांचे हत्यार आहे, शस्त्र आहे. हे जर लक्षात घेऊन ‘सामना’ वाचला असता किंवा चोरून वाचत होतात तो उघडपणे वाचला असतात तर आज आमच्यासोबत सामना करण्याची वेळ आली नसती, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.






























































