
महाराष्ट्रातून निघून गेलेले प्रकल्प, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद यावर आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सत्ताधारी सकाळी एक मुद्दा काढून भलतच वातावरण निर्माण करायचं, तर दुपारी जयंत पाटलांच्या मागे लागून विषय भरकटवुन टाकायचा, असे उद्योग करत आहे. माध्यमांवर बातम्या वेगळ्या चालत राहतील या उद्देशाने दिवसभर कामकाज तहकूब केलं जात आहे. सभागृहात आम्ही जेथे बसतो तेथे अनेक वर्षे काम केलेले अनुभवी नेते आहेत, तरीही आम्ही शांत होतो. मात्र कालची सत्ताधाऱ्यांची वागणूक लोकशाहीसाठी चांगली नव्हती. ही लोकशाही संपवण्याची एकतर्फी वागणूक होती. आम्ही सत्य लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ‘सत्यमेव जयते’च्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यांची बाजू ‘सत्तामेव जयते’ची आहे आणि ती कधीच जिंकणार नाही. सत्यमेव जयतेच जिंकणार. असे मत युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. विरोधकांनी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी ते म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा घोटाळा व गैर व्यवहार लोकांमध्ये येऊ नये हाच सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. आज आम्ही विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत आहोत. आज जागतिक शेतकरी दिवस आहे. मागच्या दोन ते तीन महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तरीही सरकारने अतिवृष्टी जाहीर केली नाही. पंचनामे होऊन प्रस्ताव गेले आहेत, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत झाली नाही. सरकार केवळ घोषणा करत आहे.
आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही महाराष्ट्र विकू देणार नाही. भूखंड विकू देणार नाही. आणि कर्नाटकला घाबरणार नाही. हा वाद न्यायालयात आहे. एकाच देशात दोन राज्यांनी वाद घालणे योग्य नाही. याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. कर्नाटक सरकारला येणारी निवडणूक जड जाणार आहे, असं दिसतंय. तिथे काँग्रेसचं सरकार येणार हे दिसू लागलं आहे. म्हणूनच बोम्मई यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे. असे ते म्हणाले.
गुजरातच्या निवडणुकीसाठी आमचे प्रकल्प पळवले. कर्नाटकच्या निवडणुकीसाठी आमची राज्य पळवत आहात. आमचे भूखंड बिल्डरांना विकाल हे आम्ही चालू देणार नाही. ही लढाई आम्ही लढत राहू असे ठाम मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.


























































