विखे – थोरात गटात अडकला उत्तरेमधील उमेदवार

सामना प्रतिनिधी। नगर

नगरच्या राष्ट्रवादी जागेच्या उमेदवारीवरुन तिढा कायम असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघा करता काँग्रेसची उमदेवारी कोणाला द्यायची यावरुन काँग्रेसमध्य मते मतांतर वाढू लागले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर ही भिस्त असली तरी दुसरीकडे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र उमेदवारीबद्दल कोणताही निर्णय न घेतल्यामुळे काँग्रेसची अवस्था नगर दक्षिणच्या जागेसारखीच आता शिर्डीमध्ये झाली आहे.

शिर्डी मतदारसंघ राखीव असल्याने तो काँग्रेसच्या वाटेला आहे. यावेळी उमेदवारी द्यायची कुणाला असा प्रश्‍न काँग्रेसपुढे उभा ठाकला आहे. साखर सम्राटाच्या या जिल्हयात आपआपले गड राखण्यासाठी एक प्रकारे शक्तीप्रदर्शन होताना दिसून येत आहे. विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाची चर्चा काँग्रेसमध्ये आहे. पण कांबळे हे विखे यांचे समर्थक असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सुरुवातीला निवडणुक न लढविता विषय केला होता. मात्र आता त्यांना विखेपेक्षा थोरात गटाकडून उमेदवारी विषयी गळ घालण्यास सुरुवात झाल्याने भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारी बद्दलच आता शंका उपस्थित होवू लागली आहे. कारण नगरमध्ये सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्याने शिर्डीच्या जागेत विखे हे कितपत लक्ष घालतील असा प्रश्‍न काँग्रेसपुढे उभा ठाकला आहे.

तर काँग्रेसकडे दुसरे नाव आकोलेल्या रुपवते कुटुंबातील येण्याची शक्यता आहे. मात्र, त्या नावापेक्षा कांबळे यांचे नांव सध्या आघाडीवर आहे. पण त्यांच्या नावाला विखे पाठींबा देणार की नाही असाही प्रश्‍न निर्माण झाल्याने सध्या संभ्रम वाढला आहे.

आपआपले गड शाबुत राखण्यासाठी या साखर सम्राटांनी याअगोदर असे प्रकारचे राजकारण केले आहे. थोरात विखे हा संघर्ष जसा जिल्हयात नवखा नाही तसा राज्यालाही नाहीच. विखेंनी उमदेवारी दिली तर थोरातांनी विरोध करायचा व विखेंनी उमेदवारी दिली तर थोरातांनी विरोध करायाचा अशी चर्चा नेहमीच सुरू असते, त्यामुळे स्थानिक पातळीवरुन उमेदवारी देण्यावरुनच सध्या धुसपुस सुरू आहे. त्यातच नेवासा हा मतदारसंघ शिर्डीकडे जोडला गेल्याने आता माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे सुध्दा वर्चस्व या मतदार संघात वाढले आहे. त्यामुळे तिघांची ताकद या मतदार संघात आता पणाला लागणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस आघाडीकडे उमेदवारीची चर्चा रेंगाळत गेल्याने किंवा उमेदवाराच्या शोधामध्ये राहिल्यामुळे ऐनवेळेला या राखीव मतदारसंघात उमेदवार द्यायचा कसा असा हा प्रश्‍न आहे. खरच एखादा गट काम करेल का ? अशी चर्चासुध्द सध्या सुरु झाली आहे. त्यातच आता माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक गायकवाड यांचे नांव देखली आघाडीकडून चर्चेला जात आहे. या अगोदर गायकवाड हे रिपब्लकन पक्षात होते त्यांनी आठवलेंना सोडचिठ्ठी देऊन त्यांनी नवीन पक्षांमध्ये बांधणी करुन तयारी सुरू केली होती. पण काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह असल्याने त्यांचे नाव मागे पडले यातच आता विखे थोरात वाद हा टोकाला गेला असताना उमदेवारी देण्यावरुन आता विखे आणि थोरात एकमत होईल का असाच काहीसा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मागील वेळेला याच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी दिली होती. तो विषय ताजा असताना या वेळेला आयात उमेदवार चालणार नाही तर स्थानिक पातळीवर उमेदवारी द्यायची कोणाला असाच प्रश्‍न काँग्रेस पुढे उभा ठाकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या