
उदगीर लातूर महामार्गावर आजनसोंडा पाटीजवळ अज्ञात वाहन आणि ऑटोच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उदगीरहून ऑटो पुणे येथे जात असताना लातूर उदगीर महामार्गवर आजनसोंडा पाटीजवळ अज्ञात वाहनाची व ऑटोची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ऑटोमधील धोंडी हिप्परगा येथील रहिवासी सुरज महाळप्पा कांबळे (20) याचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी लातूरला पाठवण्यात आले आहे. मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लातूर उदगीर महामार्गवरील अजनसोंडा पाटीजवळील हे वळण अतिशय धोकादायक झाले असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ‘धोक्याचे वळण’ अशी पाटी लावणे गरजेचे आहे. या महामार्गवर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे वारंवार येथे अपघात होत आहेत. आणखी किती बळी घेतल्यानंतर महामार्ग प्रशासनाला जाग येणार आहे याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


























































