माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर 

पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या तपासात पोलिसांची दिरंगाई होत असल्याने भुईटे यांच्या हत्येचा तपास मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे सोपवावा आणि अटक केलेल्या आरोपींची नार्कोटेस्ट चाचणी करावी अशी मागणी भुईटे यांच्या पत्नी शुभांगी भुईटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

नगरसेवक संदीप पवार यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा दोन महिन्यात तपास करुन २५ मारेकऱ्यांना अटक केली. त्यातील प्रमुख आरोपीवर मोकाची कारवाई करण्यात आली. माझ्या पतीच्या हत्येला चौदा महिने झाले आहेत. मात्र पोलीस अजूनही नामदेव भुईटे यांच्या हत्येमागील सूत्रधारापर्यंत पोचलेले नाहीत. पंढरपूर मधील दोन नगरसेवकांच्या हत्येतील हा विरोधाभास आहे. मिरज पोलिसांकडून तपास काढून माझ्या पतीच्या हत्येचा तपास मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी भुईटे यांच्या पत्नीनं केली आहे. येत्या आषाढी वारीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या मागणीबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास वारीच्या निमित्ताने पंढरपूरला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालू असा इशारा शुभांगी भुईटे यांनी दिला. नामदेव भुईटे यांची मिरज हद्दीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी भुईटे यांच्या तीन मित्रांना अटक केली आहे. यातील प्रमुख संशयित आरोपी राजू भिंगे सध्या अटकेत असून अन्य दोन संशयित आरोपीची जामिनावर सुटका झाली आहे.