
”पोरी काय करणार? मुलगा असता तर आधार झाला असता.” समाजाच्या या कुत्सित टोमण्यांना आणि बुरसटलेल्या विचारांना संगमेश्वरच्या एका रणरागिणीने आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने उत्तर दिले आहे. मांजरे-कळकदे सारख्या दुर्गम भागातील नम्रता मनिष देसाई हिने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी खाकी वर्दी परिधान करून सिद्ध केले की, कष्टाला जिद्दीची जोड मिळाली की, नशिबालाही दरवाजेही उघडावे लागतात.
नम्रताचे वडील मनिष देसाई हे वॉचमनची नोकरी करतात. तर आई नम्रता देसाई शिवणकाम करते. घरात तीन मुली, मुलगा नाही. पण या आई- वडीलांनी कधीही पोरींना ‘परक्याचं धन’ मानलं नाही. “मुलगा नाही तर काय झालं, तुम्ही मुलगा होऊन दाखवा,” हा वडीलांचा शब्द नम्रताने काळजात कोरला होता. आईच्या हाताला शिवणकाम करताना पडलेले फोड आणि वडिलांनी रात्रीच्या प्रहरी सोसलेली थंडी, याचे पांग फेडण्यासाठी नम्रताने ‘खाकी’चं स्वप्न डोळ्यात साठवलं होतं.
घरची परिस्थिती बेताची, पदरी बी.कॉमची पदवी पण खिशात क्लास लावायला पैसे नव्हते. तरीही नम्रता डगमगली नाही. ५-६ मित्रांचा ग्रुप बनवून तिने गावच्या मातीत घाम गाळला. पहाटेच्या अंधारात धावताना तिला फक्त समोर ‘खाकी वर्दी’ दिसत होती. कोणत्याही नामांकित अकॅडमीशिवाय, स्व-अभ्यासाच्या जोरावर तिने पोलीस भरतीच्या मैदानात अशी काही झेप घेतली की पाहणारे पाहतच राहिले.
नम्रताच्या या देदीप्यमान यशाची बातमी समजताच संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांनी नम्रताची प्रत्यक्ष भेट घेऊन तिचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरही तिचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जात आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नम्रताला हजारो शुभेच्छा दिल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर, अनेकांनी नम्रताचे यशाचे फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवून या ‘लेकी’चा अभिमान व्यक्त केला आहे. तिच्या संघर्षाची गाथा आज अनेकांच्या मोबाईल स्क्रीनवर ‘स्टेटस’ बनून झळकत असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
नम्रताचे काका पोलीस दलात आहेत, त्यांना पाहून तिने खाकीची स्वप्नं पाहिली. आज जेव्हा तिची पोलीस म्हणून निवड झाली, तेव्हा मांजरे-कळकदे गावाच्या मातीत विजयाचा गुलाल उधळला गेला. ही केवळ एक नोकरी नाही, तर त्या बापाच्या विश्वासाचा विजय आहे ज्याने आपल्या लेकीला ‘मुलगा’ मानून वाढवलं. नम्रता ही तीन बहिणींमध्ये मोठी, आज तिने आपल्या दोन्ही लहान बहिणींसाठी यशाचा असा महामार्ग तयार केला आहे, जिथे फक्त स्वाभिमान आणि कर्तृत्व झळकेल.
शिपाई म्हणून भरती झाली असली तरी नम्रताची भूक अजून शमलेली नाही. तिच्या डोळ्यात आता अधिकारी होण्याची चमक आहे. “खाकी वर्दी घातली आहे, आता हीच वर्दी अभिमानाने मिरवत पोलीस अधिकारी होऊन समाजाची सेवा करायची आहे, असा आक्रमक निर्धार तिने व्यक्त केला आहे. ज्या समाजात आजही मुलींना दुय्यम मानलं जातं, तिथे नम्रता देसाई नावाच्या या ‘पोलीस’ कन्येने एक नवा इतिहास रचला आहे. तिच्या या यशाने अख्ख्या संगमेश्वर तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे!
नम्रताच्या या यशावर तिचे वडील मनिष देसाई यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. कंठ दाटून आलेल्या सुरात ते म्हणाले की, “समाजात वावरताना अनेकदा लोक विचारायचे की तीन मुली आहेत, म्हातारपणी तुमचा आधार कोण? तेव्हा काळजात कळ यायची. पण आज नम्रताने खाकी वर्दी मिळवून त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. रात्रभर पहारा देताना जी थंडी वाजायची, ती आज लेकीच्या यशामुळे सुखावली आहे. आज मला अभिमानाने सांगावसं वाटतंय की, मी फक्त तीन मुलींचा नाही, तर एका शूर ‘पोलीस’ कन्येचा बाप आहे. तिने माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आज खऱ्या अर्थाने मी एका मुलाचा बाप झालो आहे.
नम्रताच्या आईने अत्यंत शांत पण तितक्याच ठाम शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “आमच्या आयुष्यात संघर्षाचा पाऊस नवा नव्हता, पण नम्रताने त्या पावसातही आपली जिद्दीची वात विझू दिली नाही. लोक काय म्हणतात यापेक्षा माझ्या लेकीला काय बनायचे आहे, याकडे आम्ही लक्ष दिले. शिवणकामाच्या यंत्रावर चालणारी माझी सुई आणि नम्रताच्या अभ्यासाची वही, या दोघांनी मिळून आज हे यश विणले आहे. तिने कधी साध्या सुखाचा हट्ट धरला नाही की परिस्थितीचे रडगाणे गायले नाही. आज ती पोलीस झाली आहे, याचा आनंद तर आहेच, पण त्याहून मोठा आनंद हा आहे की, तिने जगाला दाखवून दिले की शांत राहून केलेले कष्ट एक दिवस असाच मोठा आवाज करतात.”




























































