
सामना ऑनलाईन । नागपूर
पक्षाने आदेश दिल्यास नागपुरातून गडकरींविरोधात निवडणूक लढवेन, असं म्हणत नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिलं आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकांदरम्यान गडकरी यांनी पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पटोले यांनी गडकरी यांना हे आव्हान दिलं आहे.
भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान नितीन गडकरींनी पटोले यांच्यावर टीका केली होती. ”आपल्याला जातीपातीच्या नावाने नाही तर केवळ विकासाच्या नावाने भंडाऱ्याची पोटनिवडणूक जिंकायची आहे. ज्यांच्यामुळे ही पोटनिवडणूक जनतेवर लादली गेली आहे. नाना पटोले हे खूपच अहंकारी व्यक्ती आहेत. भाजप या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव करूनच दाखवणार. तसेच, साकोली क्षेत्रातूनही त्यांचे राजकारण संपविल्याशिवाय आम्ही राहणार नाही” असं गडकरी म्हणाले होते.
नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात येण्याचं आव्हान दिलं आहे. एकतर गडकरींनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अन्यथा पक्षाने आदेश दिल्यास मी नागपुरातच गडकरींविरोधात निवडणूक लढवेन, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.


























































