मिंधेंचा ‘हा’ सहकारी कोण? नागपुरातील सत्ताधारी बडय़ा नेत्याला अदानींकडून 150 कोटी!

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी मिंधे सरकारला चांगलेच घेरले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोपांचा घणाघाती हल्ला सुरु ठेवला आहे. गौतम अदानींनी सरकारमधील सहकाऱयाच्या खात्यात 150 कोटी रुपये टाकले आहेत, असा नवा सनसनाटी आरोप नाना पटोले यांनी रविवारी केला. हे पैसे कसले? याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अधिवेशनात आधीच नवाब मलिक यांच्या एन्ट्रीमुळे वातावरण तापले आहे. त्यात नाना पटोले यांनी नवनव्या गंभीर आरोपांची तोफ धडाडत ठेऊन मिंधेंची झोप उडवली आहे. त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मिंधे सरकारचे गौतम अदानींशी लागेबांधे असल्याची पोलखोल करताना नवा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली. आमच्या हाती आणखी एक मोठी गोष्ट लागली आहे. गौतम अदानींनी सरकारमधील एका सहकाऱयाच्या खात्यात जवळपास 150 कोटी रुपये टाकले आहेत. हे पैसे कशाच्या आधारे टाकलेत, हा प्रश्न आम्ही सरकारला विचारणार आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपाने मिंधेंच्या पायाखालची वाळू घसरली असून राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पटोलेंचा निशाणा कोणावर?

नाना पटोलेंनी मिंधे सरकारमधील कुण्या नेत्याचे नाव न घेता आरोप केला आहे. मात्र त्यांनी मिंधेंचा तो सहकारी नागपूरचा बडा नेता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर असलेला तो नेता कोण आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी या मुद्दय़ावरून सरकार चांगलेच काsंडीत सापडण्याची चिन्हे आहेत.