
देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागांतही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना उपाययोजना करण्याचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांच्या प्रचारात मग्न आहेत. 130 कोटी जनतेला रामभरोसे सोडून पंतप्रधानांना विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या वाटतात. असा बेफिकीर, बेजबाबदार पंतप्रधान गेल्या 70 वर्षांत देशाने पाहिला नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
पंतप्रधान मोदी मास्क घालत नाहीत
गुजरात सरकारने जनतेला रामभरोसे सोडले आहे, असे ताशेरे गुजरात उच्च न्यायालयाने ओढले आहेत. देशातील कोरोनाचे भयावह चित्र पाहवत नाही, पण देशाचा प्रधानमंत्री मात्र पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत हजारोंच्या सभा घेण्यात व्यस्त आहे.
जाहिरातीतून जनतेला कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान मोदी स्वतः मात्र प्रचारसभांसह अनेक कार्यक्रमांत मास्क घालत नाहीत. अशा पंतप्रधानांचा लोकांनी काय आदर्श घ्यावा, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.


























































