भाजपचे बारा आमदार सभागृहात कसे बसतात? नाना पटोले यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन झालेले असताना सभागृहात कसे उपस्थित राहतात. सभागृहाने वर्षभरासाठी त्यांचे निलंबन केले होते. या निलंबनाची मुदत संपण्यापूर्वीच कोणत्या नियमाने सभागृहात बसतात, असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. या प्रकरणी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभा उपाध्यक्षांकडे निवेदन देऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बारा आमदारांचे निलंबन रद्द केले होते.

मात्र याबाबतची अधिकृत घोषणा सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. हे 12 आमदार सभागृहात बसतात कसे? त्यांचे निलंबन मागे घेतले आहे का? कोणत्या निर्णयाने ते सभागृहात बसतात? त्यामुळे ही माहिती सभागृहात द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी या वेळी केली.