नाणार प्रकल्प- भूसंपादनाची अधिसूचना आचारसंहितेआधी मागे घेणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अधिसूचना मागे घेतली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.

राज्यातील मोठ्या प्रकल्पांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी उपसमितीची बैठक झाली. या बैठकीला उद्योमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम उपस्थित होते. या बैठकीची माहिती देताना अधिसूचना रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली. या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणारचा प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. नाणारची भूसंपादन अधिसूचना रद्द करावी असा प्रस्ताव उद्योग विभागाने पाठकला आहे. या प्रस्तावावर निर्णय कधी होणार, अशी विचारणा देसाई यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अधिसूचना रद्द केली जाईल असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र औद्योगिक किकास 1961च्या कायद्यातील तरतुदीनुसार नाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी असा प्रस्ताव आमच्या विभागाने दिला आहे. प्रस्ताव पाठवून अनेक महिने झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. आता आमची युती झाल्याने नाणारचा प्रकल्प रद्द करण्याकर आम्ही ठाम आहोत. जर ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे अन्य जिल्ह्यात अथवा गावात स्वागत होत असेल तर त्याला आमची हरकत नाही अशी भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे देसाई यांनी सांगितले.

रत्नागिरीत गुंतवणुकीबद्दल सकारात्मक
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमबरोबर आम्ही हिंदुस्थानातील गुंतवणुकीबद्दल काम करत आहोत. रत्नागिरीत रिफायनरीसाठी 1.2 दशलक्ष बॅरलची गुंतवणूक करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असे सौदी अरामकोचे मुख्य कार्यकारी अमीन नासर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

डबल ढोलकी
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याची नुकतीच घोषणा केली, तर दुसरीकडे रत्नागिरीतील राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समितीच्या वतीने ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थकांच्या मेळाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे भाजपने नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल डबल ढोलकी असेच धोरण स्वीकारले आहे की काय,अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मेळाव्यात रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने, देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे आणि राजन तेली उपस्थित राहणार आहेत.