
रायगड भूषण पुरस्कार प्राप्त निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांचा 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 1मार्च ) महाराष्ट्रासह परराज्यातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.30 वाजता रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक जयवंत गायकवाड, यांनी शासनाचे वतीने शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये, अलिबाग शहर, अंतर्गत रस्ते समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बेगरुळ, कर्नाटक याठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता अभियानात 23 ठिकाणे, 7 किमी समुद्र किनारा, 183 किमी रस्ते, 350 शासकीय कार्यलये, 62 हॉस्पिटल, 41 पोलीस ठाणे, 13 बसस्थानके, रेल्वे स्टेशन 8, तलाव 1 स्वच्छ केले. 39 हजार 40 श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन 505 वाहनांच्या सहाय्याने 806 टन कचरा गोळा करून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात 39 लाख 48 हजार 874 चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडामार्फत सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने वृक्ष लागवड आणि संवर्धन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दाखले वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, अंध व मुखबधीर विद्यार्थांना मदत. उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, जनजागृती शिबीर, पाणपोई, आपतग्रस्तंना मदत यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. गेल्या काही वर्षापासून प्रतिष्ठानमार्फत देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच्या या महान कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत त्यांनी जेष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.

























































