
सामना प्रतिनिधी। तामसा
बोअरींग मशीन वाहून नेणारी गाडी पाथरड पुलावरून नदीत कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. यात गाडीखाली आल्याने एकाचा मृत्यू झाला तर उपचारासाठी नांदेडला नेत असताना दुसऱ्याचा वाटेतच मृत्यू झाला. आज सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान पाथरड येथे हा अपघात घडला. दरम्यान बांधकाम खात्याच्या दुर्लक्षपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे .
तामसा ता.हदगाव परिसरात अनेक महिन्यांपासून कर्नाटक राज्यातील बोअरींग गाडी क्रमांक के.ए.01 एम.क्यु.7989 ही गाडी बोअर पाडण्याचे काम करण्यासाठी आली होती. मंगळवारी सकाळी पाथरड शिवारात बोअर पाडण्यासाठी गाडी निघाली होती. गाडी पाथरड नदीच्या पुलावरून जात असताना अचानक पूल ढासळला आणि बोअरींग मशीन असलेली गाडी पुलासह नदीत कोसळली. गाडी पलटी झाल्याने चालकासह सहा मजूर गाडीखाली अडकले. गाडी कोसळताना मोठा आवाज झाल्याने पाथरड गावातील नागरिकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. यावेळी शेकडो तरुण अपघातग्रस्तांच्या मदतीच्या धावून आले. त्यानंतर गाडीतील रॉडखाली अडकलेल्या पाच मजूरांना बाहेर काढण्यात आले. पण राम राजू सुकपन (24) हा गाडीखाली सापडून जागीच ठार झाला. त्याला काही काढता आले नाही. दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य सुरू केले.
यावेळी दोन क्रेनच्या मदतीने गाडी उचलून त्याखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. जखमीमध्ये प्रेमसिंग स्वामी (25), पुजीराम गणराम (35), सुनिल रामसिंग (28), प्रुणू ब्रिज (25), महंमद रशीद (35) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जखमींना नांदेडला पाठवले यावेळी वाटेत एकाचा मृत्यू झाला.
जि.प.बांधकाम खात्याच्या दुर्लक्षानेच घडला अपघात
पाथरड नदीवरील पूल हा जवळपास 1985 साला दरम्यान बांधण्यात आला होता. पूल अत्यंत कमकुवत असल्याने मागील पावसाळ्यात हा पूल पुरात वाहून गेला. पाथरड गावात बंद झाल्याने याची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. या पुलाचे पक्के बांधकाम करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र जि.प.च्या बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने ही गंभीर घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे






























































