नांदेडच्या हदगावात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हदगाव तालुक्यातील वडगाव (बु.), हदगाव येथील शुभम सदाशिव पवार या 23 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. आज रविवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तामसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येऊन आंदोलन करण्यात आले.

वडगाव येथील शुभम सदाशिव पवार याने शनिवारी अर्धापूर येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे मध्यरात्री उघड झाले. या घटनेनंतर पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते तामसा शहरात दाखल झाले. शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय न घेतल्याने आंदोलन करून तामसा शहर कडकडीत बंद ठेवले होते. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून शुभम पवार याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वडगाव (बु.) या मूळ गावी आणण्यात आले. तामसा ते वडगाव अशी 2 कि.मी. अंतरावरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. वडगाव येथील त्याच्या शेतात अत्यंत शोकाकूल वातावरणात शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुभमच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.

तामसा येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने शहरात व वडगाव (बु.) येथे सायंकाळपर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भोकरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशावरून तामसा, हिमायतनगर, भोकर, मनाठा, हदगाव, अर्धापूर येथून मोठी पोलीस कुमक मागविण्यात आली होती. हदगाव उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. या घटनेनंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करीत जुने व नवे बसस्थानक परिसरात टायर जाळून सरकारचा निषेध केला. यावेळी संतप्त जमावाने शासनाच्या विरोधात नारेबाजी केली.

जिल्ह्यातील दुसरा बळी
हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सुदर्शन देवराये या तरुणाने मराठा आरक्षणासाठी सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. आता हदगाव तालुक्यातील वडगाव (बु.) येथील शुभम पवार याने आत्महत्या केली. दिवसेंदिवस मराठा आंदोलने तीव्र होत आहेत. मयत शुभम सदाशिव पवार याच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचे वडील अत्यल्प भूधारक शेतकरी असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते वीज वितरण कंपनीत खासगी तत्त्वावर मजुरी करतात तर शुभम हा 12वीच्या शिक्षणानंतर मुंबई येथील एका खासगी कंपनीत काम करीत होता, असे सांगण्यात आले.