
गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमुळे धर्माबाद तालुक्यातील शेती पूर्णत: पाण्याखाली गेलेली असताना या भागाचे भाजपचे आमदार राजेश पवार पाहण्यास तयार नसल्याने रोशनगावच्या शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी धर्माबाद शहरात भीक मांगो आंदोलन करून लोकप्रतिनिधींचा निषेधही करण्यात आला होता.
मागच्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, यामुळे धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव शिवारात आलेल्या पावसामुळे आणि प्रचंड पुरामुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उभे पीक वाया गेले असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून मदतीची कुठलीही ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी अखेर सामूहिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
गावातील शेतकरी शेतीकडे जमले. या प्रसंगी त्यांनी आमच्या शेतीचे झालेले प्रचंड नुकसान, गावाच्या जवळ असलेली शेती जलमय झाली, जनावरांसाठी चारा नाही, तरीही प्रशासन झोपले आहे, असा आरोप केला. धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथे त्रस्त नागरिकांनी आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी 17 ते 18 नागरिकांना पाण्याचा त्रास झाला आणि नाकातोंडातून पाणी पोटात गेल्यामुळे तत्काळ त्यांना रुग्णवाहिका बोलावून धर्माबाद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
या भागाचे आमदार भाजपचे राजेश पवार यांनी या परिसरात पाऊल देखील टाकले नाही. जलसमाधी घेतलेल्या 17 ते 18 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले




























































